सरपंचाचा प्रताप: एकाच जागेवर परिवारातील तीन सदस्यांना घरकुलाचा लाभ

मुक्ताईनगर:  तालुक्यातील राजुरा येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच व विद्यमान प्रभारी सरपंचांनी एकाच जागेवर परीवारातील तीन सदस्यांना घरकुलाचा लाभ देवून त्याची रक्कमही लाटल्याचा आरोप आहे. यासंदर्भात तक्रार करण्यात आल्याने या घरकुल घोटाळ्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

राजुरा  ग्रा.पं. उपसरपंच व आताचे प्रभारी सरपंच राहुल रोटे यांनी शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेतर्ंगत १२६/ या  ग्रा.पं. च्या ८ अ उतार्‍यावर घरकुल निधीचा लाभ घेतला आहे. १२६ /१,२,३ ही जागा अद्यापही बखळ आहे.

फौजदारी कारवाईची मागणी

राहुल रोठे यांच्या वडिलांच्या नावाने जागा असून १२६ च्या याच जागेवर त्यांनी भाऊ व त्यांच्या पत्नीच्या नावेही घरकुल योजनेच्या  लाभ घेतला आहे इतकेच नव्हेतर शासनाच्या गायगोठा योजनेचेही मष्टर काढले असून यात ग्रामसेवक व रोजगार सेवक अशा शासकीय अधिकार्‍यांच्या संगनमताने लाभ घेतला असल्याने त्यांच्याविरुद्ध चौकशीअंती फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पंकज रामधन रोटे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. जिल्हा परिषदेच्या आदेशान्वये गटविकास अधिकारी पंचायत समिती मुक्ताईनगर यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले. गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे सांगितले असता त्यांनी या जागेवर घरकुलाचे बांधकाम अर्धवट असून गाय गोठा दिसत नसल्याचे अहवालात नमुद केले आहे मात्र या प्रकरणाला दोन महिन्याचा कालावधी होवूनसुद्धा दोषींवर कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

यांच्यावर निधी अपहाराचा ठपका

राहुल रोटे हे ११ फेब्रुवारी २०२१ पासून ग्राम पंचायत सदस्य उपसरपंच व आता प्रभारी सरपंच पदावर कार्यरत आहेत. त्यांनी दोन वर्षाच्या कालावधीत कल्पना राहुल रोटे, रामधन रोटे, वैशाली रामधन रोटे, गौतम रोटे व दीपाली गौतम रोटे यांचे नावे घरकुल व गाय गोठ्याच्या निधीचा लाभ घेवून शासनाच्या निधीचा अपहार केला आहे. यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पंकज रामधन रोटे यांनी केली आहे .