जळगाव : कोरोना संसर्ग झाल्याने अंगणवाडी मदतनीस मंगला पाटील यांचा मृत्यू झाला. प्रकल्प कार्यलयात कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या कुटुंबियांना विम्याची रक्कम मिळाली नाही,. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीकरिता गुरुवार, ६ जून रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्यात येणार असल्याने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
संघटनेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अंगणवाडी कर्मचारी यांनी काम करत होत्या. याची दखल घेत शासनाने या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना पन्नास लाख रुपयांचे विमा कवच लागू केले होते. कोरोना काळात काम करत असताना पाचोरा प्रकल्पातील वरखेडी येथे मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या मंगला गणपत पाटील यांचा कोरोना संसर्ग होवून मृत्यू झाला. त्यांचा विमा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर सादर केला असता त्यात काही त्रुटी निघाल्या. या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी जि.प.च्या महिला बालविकास विभागाने १६ जून २०२३ रोजी प्रकल्प कार्यालयाला पत्र दिले आहे.परंतु, प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी दिनेश पाटील आणि प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी जिजा राठोड यांच्या कामकुचार व हलगर्जीपणामुळे सदरच्या त्रुटींची वर्षभरात ही पूर्तता झालेली नाही. परिणामी मंगल पाटील यांच्या वारसांना आजपर्यंत विमा रक्कम मिळाली नाही. पाचोरा प्रकल्पात नव्याने कामावर रुजू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची माहिती आजपर्यंत PFMS मध्ये अद्यावत न केल्यामुळे सदर मदतनीस सुमारे वर्षभर मानधनापासून वंचित असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
तसेच बहुसंख्य अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांना सन २०२३-२०२४ ची गणवेश रक्कम, भाऊबीज भेट रक्कम आणि प्रवास भत्ते बिल अदा झालेले नाही. या सर्वांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने ४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रकल्प कार्यालयासमोर उपोषण करणेबाबत नोटीस दिली होती.परंतु, जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत यांनी मध्यस्थी केल्याने उपोषण स्थगित केले होते. परंतु, सुमारे तीन महीन्यात महिला बालविकास विभाग आणि पाचोरा प्रकल्प कार्यालयांनी आजतागायत कोणतीही कार्यवाही केली नाही. याला जबाबदार असणाऱ्या दिनेश पाटील आणि जिजा राठोड यांच्या निलंबन करावे मंगल पाटील यांच्या वारसांना विमा रक्कम मिळावी तसेच प्रकल्पातील अन्य प्रश्न सोडविण्यात यावेत.
या मागणीसाठी मयत मंगल गणपत पाटील यांच्या वारसदार आईंसह संपूर्ण कुटुंब अंगणवाडी कर्मचारी आणि संघटनेचे प्रतिनिधी राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि.६ जून २०२४ रोजी जिल्हा परिषद समोर उपोषणास बसणार आहेत.