विद्यार्थी हिताबरोबर विद्यापीठात ‘शेतकरी सहाय्य योजना’, इतक्या कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष 2023-24 साठीचा 308.04 कोटीचा अर्थसंकल्प गुरूवार 16 मार्च रोजी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात 24.30 तूट सादर करण्यात आली असून काटकसरीचे धोरण लक्षात घेवून मागील वर्षाच्या एकूण तरतूदीतून 4 कोटी खर्चात कपात करण्यात आली आहे. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित व नवनियुक्त अधिसभा सदस्यांची ही पहिलीच बैठक होती. वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील यांनी हा अर्थ संकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर झालेल्या चर्चेअंती विलास जोशी, नितीन ठाकूर, अमोल मराठे, एकनाथ नेहते यांनी मांडलेल्या कपात सूचना मागे घेतल्या. सर्व सदस्यांनी अर्थसंकल्पावर चर्चा करून आपली मते मांडली. विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याचे मत मांडण्यात आले आणि काही सूचना करण्यात आल्या.

अर्थसंकल्पात परीरक्षणासाठी 210.45 कोटी, योजनांतर्गत विकासासाठी 56.51 कोटी आणि विशेष कार्यक्रम/आयोजनासाठी 41.08 कोटी असा एकूण 308.04 कोटी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. उत्पन्नाची तरतूद 283.74 कोटी असल्यामुळे 24.30 कोटी इतक्या तुटीचा हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. खर्चात बचत करून ही तूट कमी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. मागील वर्षी 33.91 कोटी तुटीचा अर्थसंकल्प होता. परंतु चालु आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीय विभागवार आढावा घेतला असता त्यात सुधारीत म्हणून 31.38 कोटी तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.
यावर्षीच्या अर्थसंकल्पात काही नव्या योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी महापुरूषांच्या जीवन चरित्रावर संशोधन करावे या उद्देशाने साने गुरूजी संशोधन शिष्यवृत्ती, बहिणाबाई संशोधन शिष्यवृत्ती, छत्रपती शिवाजी महाराज संशोधन शिष्यवृत्ती अशा तीन संशोधन संशोधन शिष्यवृत्ती सुरु करण्यात येत असून प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी दरमहा 10 हजार रूपये असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप राहील. ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये बहिणाबाई अभ्यासिका केंद्राची स्थापना विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्रामार्फत केली जाणार असून त्यासाठी 10 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. महाविद्यालय सुटल्यानंतर ग्रामिण भागातील महाविद्यालयांमध्ये या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांसाठी पुस्तके, पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था, देखरेखीसाठी एक कर्मचारी अशा सुविधा दिल्या जातील. विद्यापीठाच्या सीटीपीसी विभागामार्फत औद्योगिक समुहांशी संपर्क साधून विविध कार्यशाळा तसेच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याताठी 5 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून त्यासाठी 20 लाखांची तरतूद आहे. विद्यार्थ्यांमधील मानसिक तणाव कमी व्हावा ‘मनकौशल्य योजना’ सुरु केली जाणार असून त्यासाठी 5 लाख निधी राखून ठेवण्यात आला आहे. विद्यापीठातील विज्ञान वाहनाचा वापर करून विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी चालते फिरते विज्ञान योजनेसाठी 6 लाख, राष्ट्रीय स्तरावरील निबंध स्पर्धेसाठी 3 लाख, नवीन शैक्षणिक धोरणाबाबत जागरूकता वाढावी व प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी राबविल्या जाणार्‍या उपक्रमांसाठी 10 लाखाची तरतूद, विद्यार्थ्यांमधून नवउद्योजक निर्माण व्हावे यासाठी आयडेशन प्रोग्राम इन विद्यापीठ महाविद्यालय या योजनेसाठी 5 लाख तरतूद करण्यात आली आहे.

संशोधन वाढीसाठी प्रयत्न
विद्यापीठ कॅम्पसवरील विद्यार्थी आणि प्राध्यापकांमधील संशोधन वाढीला लागावी यासाठी रिसर्च मोटीव्हेशन ऑन कॅम्पस योजना राबविण्यात येणार असून पंजीकृत संशोधक विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये संशोधन पेपर प्रसिध्द झाल्यास प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाईल.तर शिक्षकांना संशोधनासाठी दरवर्षी एकरकमी अर्थसहाय्य दिले जाईल. त्यासाठी 50 लाखाची भरीव तरतूद करण्यात आली आहे. विद्यापी परिक्षेत्रातील शेतकर्‍यांना शासकीय योजना, बाजारातील नवीन घडामोडी माहित व्हाव्यात यासाठी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखील ‘शेतकरी सहाय्य योजना’ राबविण्यात येणार असून त्यासाठी 5 लाखाची तरतूद आहे. एम. ए. योगा, एम.ए. नाट्यशास्त्र हे नवे अभ्यासक्रम सुरु करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी एकूण 20 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. तथागत भगवान बुध्दांचे तत्वज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु केला जाणार आहे. संगणकशास्त्र प्रशाळेमार्फत तीन नवे अभ्यासक्रम सुरु केले जाणार आहेत. विद्यापीठ कॅम्पससाठी वसतिगृह दिवस साजरा केला जाणार असून त्या साठी 5 लाख रूपये, राष्ट्रीय फिल्म उत्सवासाठी 5 लाख, नेचर अ‍ॅण्ड कन्झरवेशन क्लब स्थापन करणेसाठी 5 लाख तरतूद करण्यात आली.

आर्थिक वर्ष 2023-24 साठी 308.04 कोटी खर्चाची तरतूद असून यात महसूली खर्च म्हणून 182.85 कोटी, भांडवली तरतूद 27.60 कोटी असून योजनांतर्गत विकासात्मक बाबींवर खर्च 56.81 कोटी आहे. परीक्षा व मूल्यमापन विभागासाठी 25.05 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षींच्या तूलनेत 3.77 कोटींची तरतूद कमी करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशाळा, केंद्र व उपकेंद्र यासाठी 13.36 कोटी, विद्यार्थी कल्याण, क्रीडा विभाग आदींसाठी 8.99 कोटींची तरतूद करण्यात आली असून. विद्यार्थी कल्याण विभागासाठी 7.25 कोटींची तरतूद, वसतिगृहांसाठी 62 लाख, ज्ञानस्त्रोत केंद्रासाठी 30 लाख, आरोग्य केंद्रासाठी 27.50, आजीवन अध्ययन विभागासाठी 25 लाख, बांधकाम विभागांर्तगत इमारत दुरुस्ती व परीरक्षणासाठी 178 लाख रूपयांची तरतूद आहे. चर्चेत नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य वैशाली पाटील, विष्णू भंगाळे, एकनाथ नेहते, नेहा जोशी, अमोल पाटील, संदीप नेरकर, रामसिंग वळवी, अमोल सोनवणे, प्राचार्य संजय सुराणा, प्राचार्य एस.एन. भारंबे, प्राचार्य के.बी. पाटील, प्रा. अनिल पाटील, डॉ. मंदा गावीत, सुरेखा पाटील, वर्षा पाटील, अजय पाटील, किर्ती कमलजा, सुनील निकम, नितीन झाल्टे, भानुदास येवलेकर, जयंत उत्तरवार आदींनी भाग घेतला.