---Advertisement---
यावल तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांच्या दीर्घकाळ सुरू असलेल्या प्रश्नांबाबत अखेर सकारात्मक तोडगा निघाल्याचा दावा करण्यात आला आहे. या घडामोडींमुळे परिसरातील शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. मधुकर सहकारी साखर कारखाना, न्हावी (फैजपूर) यासंबंधीच्या विविध मुद्द्यांवर सातत्याने पाठपुरावा केल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याचे माजी नगराध्यक्ष पिंटू राणे यांनी सांगितले.
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राणे यांनी गेल्या दहा वर्षांपासून कृती समितीच्या माध्यमातून हा संघर्ष सुरू असल्याचे स्पष्ट केले. कारखान्याशी संबंधित अडचणी, उस उत्पादकांचे प्रलंबित प्रश्न तसेच आर्थिक बाबींवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या प्रयत्नांमुळे संबंधित यंत्रणांना निर्णय घ्यावा लागला आणि शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मार्गी लागल्याचा दावा त्यांनी केला.
या बैठकीस बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपूत, उपसभापती दिपक चौधरी, पंचायत समितीचे माजी उपसभापती दिपक अण्णा पाटील आणि शेतकरी हितासाठी कार्य करणारे गिरीष कोळंबे उपस्थित होते. उपस्थितांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित केली.









