शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई दसरा-दिवाळीपर्यंत देणार!

जळगाव :  खरीप हंगामांतर्गत प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत ज्या महसूल मंडळांमध्ये सलग 21 दिवस पावसाचा खंड पडला आहे, जिल्ह्यातील अशा 27  महसूल मंडळातील शेतकरी पीक विम्याच्या निकषात पात्र ठरले आहेत. त्यांना नुकसान भरपाईच्या 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई  दसरा, दिवाळीपर्यंत देण्याचे आदेश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबई येथील बैठकीत दिले. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ही मागणी केली होती. त्यावर कृषीमंत्र्यांनी तत्काळ आदेश काढले आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पालकमंत्री पाटील यांनी कृषीमंत्री मुंडे यांना पत्र देवून मागणी केली होती, यात त्यांनी म्हटले होते की, पंतप्रधान पीक विमा योजनतेर्गंत ज्या महसूल मंडळामध्ये सलग 21 दिवस पावसाचा खंड पडला आहे, अशा सुमारे 27 महसूल मंडळातील शेतकरी पीक विमा निकषाप्रमाणे पात्र ठरले आहेत. जिल्ह्यातील या पात्र महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना विम्याच्या निकषाप्रमाणे 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई देय असून ती क्षेत्र पडताळणी करून तत्काळ देण्याबाबत संबधितांना योग्य ते निर्देश देण्यात यावेत.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या या पत्रानुसार कृषी मंत्री मुडे यांनी मुंबईत मंत्रालयात  बैठक आयोजित केली होती, यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, कृषी सचिव अनुकुमार यादव, व कृषी आयुक्त सुनील चव्हाण, पाणीपुरवठा मंत्र्यांचे खाजगी सचिव अशोक पाटील उपस्थित होते.

याप्रसंगी कृषीमंत्री मुंडे यांनी तातडीने निर्देश दिले, की, राज्य सरकारच्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेच्या माध्यमातून प्रतिकूल हवामान परिस्थितीच्या निकषांमध्ये पात्र झालेल्या 27 महसूल मंडळांतील पात्र शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रिम नुकसान भरपाई विमा निकषाप्रमाणे देय आहे. पात्र महसूल मंडळांबाबत तत्काळ अधिसूचना निर्गमित करण्याबाबतच्या सूचना यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. दिवाळीपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा दसरा- दिवाळी शेतकरी सुखी होवो म्हणून सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याप्रसंगी  जिल्हा पीक विमा व शेतकरी समितीचे सी.ए. हितेश आगीवाल व मोहाडी सरपंच धनंजय सोनवणे हेही उपस्थित होते.