जळगाव : बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठे आर्थिक नुकसान होत असून फसवणूक वा आथीक नुकसान होऊ नये. यासाठी शेतकऱ्यांनी खरीप, रब्बी कोणत्याही हंगामासाठी बियाणे खरेदी करताना विशेष सतर्कता बाळगावी ,असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी यांनी केले आहे.
कोणत्याही कंपनीचे बियाणे बनावट हे ओळखणे सहज शक्य नसते. त्यासाठी खरीप वा रब्बी हंगामांतर्गत पेरणी लागवडीसाठी बियाणे खरेदी करताना अधिकृत परवानाधारक बियाणे विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे. पक्क्या बिलाची मागणी करावी. जेणेकरून भविष्यात बोगस बनावट बियाण्यामुळे पिकाची उगवण न झाल्यास अथवा कणसाना दाणे भरतेवेळी नुकसान झाल्यास नुकसानीचा दावा करताना उपयोगी होईल.
शेतकऱ्यांनी बियाण्याचे पाकीट खरेदी करून ते पेरणी, लागवडीवेळी उघडल्यानंतर त्यातील काही बियाण्याचे नमुना बाजूला राखून ठेवावा. प्रत्येक पाकिटावर प्रमाणपत्र टॅग आणि मुदतीची तारीख असते, ती काळजीपूर्वक तपासून जपून ठेवावी. जेणेकरून पुढील तपासणीसाठी उपयोगी ठरते.
कुठल्याही फिरत्या विक्रेत्यांकडून किंवा एमआरपीपेक्षा कमी दरात बियाणे विक्रि केले जात असल्यास त्या बियाण्यांसंदर्भातत शंका घ्यावी आणि संबंधित कृषी अधिकाऱ्यांना याची माहिती द्यावी. या बियाण्याचे पुनश्च अथवा दुसऱ्यांदा शिलाई पॅकिंग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे उत्पादनात घट येऊ शकते.
बियाण्याची खरेदी करतवेळी जमिनीची पोत आणि उत्पादन क्षमतेनुसार योग्य कंपनीचेच बियाण्यांची निवड करावी. केवळ शेतकऱ्यांकडून बाजारात मागणी आहे म्हणून कोणतेही बियाणे घेऊ नये. बोगस बनावट बियाणे व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर एकूण 16 पथके नेमण्यात आली असून या पथकामार्फत वेळोवेळी कारवाई केली जाणार आहेत. याशिवाय अनुचित वा बनावट बियाणे विक्री होत आहे. असे आढळून आल्यास शेतकऱ्यांनी 18002334000 हा टोल फ्री क्रमांकांवर संपर्क करून तक्रार करता येणार असल्याची माहिती कुर्बान तडवी यांनी दिली.