गौताळा कन्नड घाटात भीषण अपघात : एक ठार, दोन गंभीर; ९ वर्षीय बालिका सुदैवाने सुखरूप

औरंगाबाद : चाळीसगाव महामार्गावरील गौताळा घाटात विचित्र अपघात झाला असून यात एक जागीच ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. यमुनाबाई पवार (वय ६८, औरंगाबाद) असे मयत महिलेचे नाव आहे. अपघातात कारमधील ९ वर्षीय बालिका सुदैवाने सुखरूप बचावली आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गौताळा कन्नड घाटात सरदार पॉईंटवर ट्रक (जीजे- ३६, व्ही- ७८५२) हा पुढे वाहन असल्याने थांबला होता. त्यामागून येत असलेली मारुती बलेनो कार (एमएच- २०, ईई- ५४७०) ही या ट्रकच्या पाठीमागे राहिली याचवेळी या कारच्या मागून ट्रक (टीएन- ३६, एडब्ल्यू- ३९९९) हा भरधाव वेगाने आला अन् जबर धडक दिली. धडक इतकी जबर होती की, कार  थेट तिच्यापुढे उभे असलेल्या ट्रकच्या खाली जावून दोन्ही ट्रकच्यामध्ये दाबली गेली. या कारमध्ये औरंगाबाद येथील कुटुंबीय धुळ्याच्या दिशेने जात होते. विचित्र अपघातात दोन्ही ट्रकमध्ये कार
दाबली गेल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील यमुनाबाई पवार यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच अश्विनी गव्हाणे (वय ३०) व चालक कृष्णा गव्हाणे (वय ६६) हे जखमी झाले आहेत. तर लहान मुलगी गौरी गव्हाणे (वय ९) सुखरूप बचावली.
दरम्यान, कारला पाठीमागून धडक देणाऱ्या ट्रकचा चालक घटनेनंतर तेथून पसार झाला. याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस शोध घेत आहेत. महामार्ग पोलिसांनी जखमींना बाहेर काढले अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस केंद्राच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली पाटील, पोलिस हवालदार योगेश बेलदार, वीरेंद्रसिंग शिसोदे, धनंजय सोनवणे, इशांत तडवी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर कारमध्ये फसलेल्या चौघांना क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना केले.