डांभुर्णी, ता.यावल : तालुक्यातील कोळन्हावीजवळ डंपर आणि दुचाकीचा अपघात होवून त्यात सावखेडासी गावातील 25 वर्षीय तरुण जागीच ठार झाला तर एक तरूण गंभीर जखमी आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी घडला. जखमीला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणी यावल पोलिसात डंपर चालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डंपर चालकाविरोधात गुन्हा
कोळन्हावी गावाजवळून शुक्रवारी सायांकळी दुचाकी (क्रमांक एम. एच. 19 डी.बी. 2746) व्दारे अमोल राजेंद्र पाटील (26, रा.सावखेडासीम, हल्ली मुक्काम सुप्रीम कॉलनी, जळगाव) व ईस्माईल हबीब तडवी (22, रा. सावखेडासीम) दोघे जात असताना जळगावकडून डंपर (क्रमांक एम. एच. 17 बी.डी. 3468) ने दुचाकीला धडक दिल्याने अपघातात अमोल पाटील हा जागीच ठार झाला तर ईस्माईल तडवी हा गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत ईस्माईल तडवी याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मयत अमोल पाटील याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. अपघातस्थळी पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे, हवालदार सलीम शेख, अनिल पाटील यांनी धाव घेत डंपर ताब्यात घेतला. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अज्ञात डंपर चालकाविरूध्द छोटू शामराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.