नंदुरबार : मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीचा शुक्रवारी रात्री ११ वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात अनिता दिलीप गावित (वय २५ ) व सुमित्रा मोहन गावित (वय ४५) रा. नवागाव खांटापाडा, या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे तर ११ जण जखमी झाले आहे. जखमींना नंदुरबार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील उमरपाटा गावाला घराच्या बांधकामासाठी नंदुरबार तालुक्यातील खांदेपाडा आणि बिजादेवी गावातील मजूर पिकअप गाडीतून कामासाठी गेले होते. रात्री परत येत असताना अकरा वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील खोकसा घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी घाटात १५ फूट खोल दरीत पलटी झाली.
यात दोन महिला जागीच ठार झाल्या असून ११ जण गंभीर जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. पण अपघात इतका भीषण होता की मजूर गाडी खाली अडकले होते शेवटी जेसीबीच्या साह्याने गाडी बाजूला करून मजुरांना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यातील अकरा गंभीर रुग्णांवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. या पिक अप व्हॅनमध्ये सर्व बांधकाम मजूर होते.
जखमी मजूर
प्रीतम विक्रम गावित वय १७, सरिता विक्रम गावित वय ३०, संतोष बन्सी गावित वय २०, ईश्वर रामदास गावित वय ३०, बन्सी रेवा गावित वय ५८, अश्विन दिलीप वळवी वय३० सर्व रा. नवागाव खांटापाडा, किसन सदाशिव सोनवणे वय १८, किस्मत सदाशिव सोनवणे वय १६, निलेश धरमदास देसाई वय ३२ सर्व रा. बिजादेवी तालुका नवापूर हे मजूर जखमी झाले.