तरुण भारत लाईव्ह ।२५ फेब्रुवारी २०२३। मध्यप्रदेश येथे भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने प्रवाशांनी भरलेल्या २ एसटी बसेसला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात १३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून ५० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशच्या सिंधी जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या तिन्ही बस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सतना येथील कार्यक्रमातून परतत होत्या. बस रात्री ९ वाजून १५ मिनिटाच्या सुमारास मोहनिया बोगद्याजवळ पोहोचल्या असता, त्यांना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, यातील दोन बस खड्ड्यात पडल्या. तर एक बस त्याच रस्त्यावर उलटली. या अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला असून ५० हुन अधिक जण जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी अपघातातील जखमींना तातडीने बाहेर काढले.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या अपघाताची बातमी मिळाल्यावर बचाव पथकासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमी प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक नेत्यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. सीएम शिवराज म्हणाले की मृतांच्या नातेवाईकांपैकी कोणी सरकारी नोकरीसाठी पात्र असेल तर त्याला त्याच्या पात्रतेनुसार नोकरी दिली जाईल, असेही अपघाताबाबत माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपये आणि जखमींना ५ लाख रुपये देण्याची मागणी केली आहे.