पुणे : महाराष्ट्रात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढ असल्याचे दिसून येत आहे. अशातच पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गुन्हेगाराने चक्क दोन पोलिसांवर कोयता हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस जखमी झाले असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विविध गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी सचिन भोसले याला पकडण्यासाठी पिंपरी- चिंचवडचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांनी रात्री सव्वा बाराच्या सुमारास सापळा लावला.
दरम्यान, आरोपी भोसले याने उपायुक्त व सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड दोघेही जखमी झाले आहेत. पुण्याच्या खेड तालुक्यातील चिंचोशी -केंदूर रस्त्यावरील चिंचोशी घाटात ही घटना घडली.
आरोपी सचिन भोसले याने पोलीस उपायुक्त व सहाय्यक पोलीस निरीक्षकांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला, सरकारी कामात त्याने अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सचिन भोसले याच्यावर विविध पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.