जळगाव : घराच्या वाटणीत जास्त हिस्सा मागितल्यामुळे पित्यानेच मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यात समोर आली आहे. भडगावच्या बाळद खुर्द गावात (Balad Khurd Murder News) ८ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बाळू राजेंद्र शिंदे (वय २६) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भडगाव तालुक्यातील बाळद खुर्द येथे शिंदे कुटुंब वास्तव्याला आहे. दरम्यान, ८ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास मृत बाळू राजेंद्र शिंदे (वय २६) याने घरच्या वाटणीत जास्त हिस्सा मागितल्याच्या कारणावरून वाद उद्भवला. या रागातून वडील राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय ४८) आणि भाऊ भारत शिंदे (वय २२) यांनी बाळूला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात लाकडी दांडक्याने चेहऱ्यावर आणि छातीवर जोरदार मारहाण केल्याने बाळूचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणी सुनिल लोटन पाटील (वय ५४, पोलीस पाटील, बाळद खुर्द) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात भारत शिंदे व राजेंद्र शिंदे यांच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम १०३(१), ११५(२), ३५२ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के आणि पोलीस नाईक महेंद्र चव्हाण करीत आहेत.
ग्राम महसूल अधिकाऱ्याचा विनयभंग
फैजपूर : फैजपूर विभागातील एका गावाच्या ग्राम महसूल अधिकारी असलेल्या महिलेचा भोरटेक पोलीस पाटील धनराज गोंडू कोळी याने सातत्याने पाठलाग करीत तसेच मोबाइलवर मेसेज करीत विनयभंग केला. या प्रकरणी संशयितांविरोधात महिलेच्या तक्रारीवरून फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ७ मार्च रोजी महिला कार्यालयात काम करीत असताना संशयित धनराज गोंडू कोळी आला व त्याने वाईट नजरेने पाहत महिलेच्या शासकीय कामकाजात अटकाव केल्याचा आरोप आहे. शिवाय १३ फेब्रुवारी रोजी संशयिताने महिलेला मोबाइलवरून प्रेम करीत असल्याचा मेसेज पाठवल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकाराने महसूल वर्तुळात खळबळ उडाली आहे.