पाचोरा : वरखेडी येथील एका शालेय विद्यार्थ्याला जीवनाची कठोर परीक्षा एकाच वेळी द्यावी लागली. त्याने आपल्या वडिलांच्या अत्यवस्थ स्थितीमध्ये व्हेंटिलेटरवर असतानाही बारावीचा पेपर दिला; पण पेपर दिल्यानंतर काही तासांतच त्याच्या वडिलांचं निधन झालं. यामुळे त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या हृदयद्रावक प्रसंगामुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.
चेतन सुनील चौधरी (१८) याचे वडील, सुनील श्रावण चौधरी (५४), हे एक गंभीर आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर नाशिक येथील दवाखान्यात उपचार सुरू होते, परंतु उपचारांचा त्यांना अपेक्षित लाभ झाला नाही. रविवारी डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला. त्यानंतर अत्यवस्थ स्थितीत असलेल्या सुनील चौधरी यांना व्हेंटिलेटरवर ठेवून घरच्या कुटुंबीयांनी त्यांना वरखेडी येथे आणले.
सकाळपासूनच गावातील नातेवाईक, महिला आणि इतर समाज बांधव त्यांना पाहण्यासाठी येत होते. अशा वेळी चेतनच्या मनाची अवस्था अत्यंत खराब झाली. एकीकडे त्याला वडिलांची काळजी आणि दुसरीकडे त्याचा शालेय बारावीचा पेपर, दोन्ही गोष्टी त्याच्या मनावर एकाच वेळी भार बनल्या. त्याच्या घरच्यांच्या आग्रहावरून चेतनने पेपर दिला.
हेही वाचा : सावधान! जळगावात पुन्हा आढळला जीबीएस रुग्ण, तीन वर्षीय बालक बाधित
परंतु, जेव्हा चेतन पेपर देऊन घराकडे परतला, तेव्हा त्याला धक्कादायक बातमी समजली, अर्थात त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. यामुळे त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या हृदयद्रावक प्रसंगामुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.
चौधरी कुटुंबाची परिस्थिती अत्यंत साधारण आहे. सुनील चौधरी हे खासगी नोकरीत होते. त्यांचा मोठा मुलगाही खासगी नोकरी करतो. त्यात दवाखान्याचा प्रचंड खर्च झाल्याने हा परिवार अडचणीत सापडला. घरात सुनील यांची वयोवृद्ध आई, मोठा भाऊ, पत्नी, एक मुलगी, दोन मुले असे सदस्य. अशा परिस्थितीत वृद्ध आईवर आपल्या मुलाला मृत्युशय्येवर पाहण्याचा दुर्दैवी प्रसंग आल्याने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.