---Advertisement---

Jalgaon Crime News: सहकाऱ्यांनाच ठगले! महिला पोलिस कर्मचाऱ्याकडून ३० लाखांची फसवणूक

by team
---Advertisement---

जळगाव – महिला पोलिस कर्मचारी अर्चना प्रभाकर पाटील हिने दोन महिला पोलिस कर्मचाऱ्यांची ३० लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

सोन्यात गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत हि फसवणूक केली आहे. या प्रकरणी ७ फेब्रुवारी रोजी अर्चना पाटीलसह सात जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला अटक केली आहे.

दोन पोलिस महिला कर्मचाऱ्यांची फसवणूक

महिला सहाय्य कक्षात कार्यरत असलेल्या पोलिस शिपाई मंगला सुभाष तायडे (३८, रा. पोलिस लाईन) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. २०२२ मध्ये एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत असताना त्यांची ओळख संशयित अर्चना पाटील हिच्याशी झाली. अर्चनाने त्यांना सोन्यातील गुंतवणुकीद्वारे मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले आणि सुरुवातीला ७०,००० रुपये गुंतवण्यास प्रवृत्त केले. महिनाभरात त्यांना ७५,००० रुपये मिळाल्याने त्यांनी अधिक रक्कम गुंतवली आणि एकूण २० लाख रुपयांची गुंतवणूक केली.

तसेच, जिल्हा विशेष शाखेतील पोलिस शिपाई वैशाली उत्तम गायकवाड (२९) यांनाही अशाच प्रकारे फसवत त्यांच्याकडून १० लाख रुपये घेतल्याचे उघड झाले आहे.

पैसे परत करण्याच्या नावाखाली टोलवाटोलवी

मे २०२४ मध्ये मंगला तायडे यांनी अर्चनाकडे पैसे परत मागितले असता, निवडणुकीच्या कामामुळे उशीर होईल, असे सांगण्यात आले. सप्टेंबर २०२४ मध्ये गुंतवणूकदारांची बैठक घेण्यात आली आणि पैसे मुंबईत अडकल्याचे सांगण्यात आले. यानंतर, ‘सायलेंट ग्रुप’ तयार करून गुंतवणूकदारांना शांत राहण्याचे आणि अफवा न पसरवण्याचे सांगण्यात आले. मात्र, लोकांचा तगादा वाढताच अर्चना ग्रुपमधून बाहेर पडली.

पोलिसांनी केली कारवाई

या फसवणुकीच्या तक्रारीनंतर अर्चना पाटील यांना निलंबित करण्यात आले आणि मुख्यालयात जमा करण्यात आले. अखेर, ७ फेब्रुवारी रोजी मंगला तायडे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून अर्चना पाटील, तिची आई कल्पना पाटील, बहिण मोनिका पाटील, बहिणीचा मुलगा विजय पाटील, मित्र मिरखा नुरखा तडवी, मानसी रवींद्र पाटील आणि मनीषा चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अर्चना पाटील हिला अटक केली आहे.

पोलिस पुढील तपास करीत असून आणखी किती लोक या फसवणुकीला बळी पडले आहेत, याचा शोध घेत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment