Jalgaon News : घरांना आग; संसारोपयोगी वस्तू खाक, दूध संघाचे संचालक रोहित निकम यांचा मदतीचा हात

जळगाव : शहरात कांचनगरात दोन घरांना आग लागून संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना आज घडली. पेटते सिलिंडर अग्नीशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी आगीपासून अलिप्त केल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, घटना कळताच शहरातील दूध संघाचे संचालक रोहित निकम यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच दोन्हीही कुटुंबाना संसारपयोगी वस्तूंची मदत केली.

सुभाष भावलाल बाविस्कर हे कांचनगरात कुटुंबासह वास्तव्यास असून ते बांधकाम क्षेत्रात ठेकेदारीने कामे घेतात. चुलतबंधूचे निधन झाल्याने त्यांच्याकडे मंगळवारी दशक्रियाविधी कार्यक्रम होता. बाविस्कर यांच्या  एका खोलीत स्वयंपाक केला जात होता. अचानक सिलिंडरमधून गॅस लिकीज होऊन आगीने अचानक पेट घेतला. पार्टीशन असल्याने आगीचा भडका झाला. या घराच्या शेजारी असलेल्या मिराबाई दगडू माळी यांचे घराच्या पार्टीशिनही आगीच्या चपाट्यात येऊन आगीने रौद्ररूप धारण केले. स्थानिक नागरिकांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. सकाळी १०.१७ वाजता अग्नीशमन विभागाला संदीप शर्मा यांनी ही खबर दिली. रस्त्यावरील वाहतूक तसेच गर्दी पार करत  चार मिनीटात अग्नीबंब घटनास्थळी दाखल झाला.सुरूवातीला कर्मचार्‍यांनी पेटलेले सिलिंडरवर पाणी मारत ते उचलून बाजूला सुरक्षित हलविले. त्यानंतर घरांची आग विझविली. या दुर्घटनेत दोन पार्टीशिन घरातील संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. संपूर्ण साहित्य खाक झाल्याने दोघा घरांचा संसार उघड्यावर आला आहे.जनमाहिती अधिकारी शशीकांत बारी यांच्यासह  सहायक अग्नीशमन अधिकारी प्रकाश चव्हाण, सुनील मोरे, अश्‍वजित घरडे, गंगाधर कोळी, रवि सपकाळे, मोहन भाकरे यांनी आग विझविली.शनीपेठचे पोनि रंगनाथ धारबळे यांचेसह पीएसआय योगेश ढिकले, अभिजित सैंदाणे यांनी याठिकाणी धाव घेतली.

आगीच्या विळख्यात एसी खाक

पूर्ण घर पार्टीशनचे असल्याने आग भडकली. यात संसारोपयोगी सार्‍याच वस्तूंची राखरांगोळी झाली. घरात असलेला एसीलाही आगीने गिळकृत केले.महिलेच्या कानातील टॉप्स, घरात ठेवलेली काही रोकड, कपाट,इलेक्ट्रॉनिक वस्तू यासह कपडे,साहित्य हे सर्वच नष्ट झाल्याने दोन कुटुंबे उघड्यावर आली. घटना कळताच शहरातील दूध संघाचे संचालक रोहित निकम यांनी घटनास्थळी जावून नुकसानीची माहिती जाणून घेतली. तेथील रहिवाश्यांकडून माहिती जाणून घेतली. निकम यांनी या दोन्हीही कुटुंबाना संसारपयोगी वस्तूंची मदत केली.