तरुण भारत लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२२ । फिफा क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला ब्राझीलचा संघ आणि २८ व्या स्थानावर असलेला दक्षिण कोरियाचा संघ यांच्यात आज दोहा येथे विश्वकरंडकातील उप-उपांत्यपूर्व फेरीची लढत रंगणार आहे.
साखळी फेरीच्या अखेरच्या लढतीत कॅमेरूनकडून ब्राझीलला पराभवाचा सामना करावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर आता पोर्तुगालवर सनसनाटी विजय मिळवत बाद फेरी गाठणाऱ्या दक्षिण कोरियाविरुद्ध ब्राझीलला सावध राहावे लागणार आहे. ब्राझीलला शनिवारी मोठा धक्का बसला. ग्रॅबियल जेसस व ॲलेक्स टेलेस या दोन प्रमुख खेळाडूंना दुखापतीमुळे बाहेर जावे लागले. जेसस काही दिवसांनंतर आर्सेनल या आपल्या क्लबशी जोडला जाणार आहे. तसेच टेलेस दक्षिण कोरियाच्या लढतीनंतर सेव्हीलाशी जोडला जाणार आहे. ब्राझील फुटबॉल संघटनेकडून ही माहिती देण्यात आली.
ॲलेक्स सँड्रो व डॅनिलो या दोघांनाही दुखापतीचा सामना करावा लागला आहे. स्वित्झर्लंडविरुद्धच्या लढतीत सँड्रो याला दुखापत झाली होती. डॅनिलो हाही दुखापतीमुळे मागील दोन सामन्यांमध्ये खेळू शकला नाही; मात्र शनिवारी डॅनिलो याने ब्राझीलच्या इतर खेळाडूंसोबत सराव केला. त्यामुळे दक्षिण कोरियाविरुद्धच्या लढतीत त्याच्या सहभागाबाबत शक्यता वाढली आहे. सँड्रो याच्या खेळण्याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे.