जळगाव : गणेश वाघ : सातबारा उतार्यावर वारसांची नावे लावून सातबारा उतारा देण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच मागून सुट्टीच्या दिवशी ती तलाठी कार्यालयात स्वीकारताना लाचखोर तलाठ्यासह कोतवालाला जळगाव एसीबीने शुक्रवारी दुपारी अडीच वाजता रंगेहाथ अटक केल्याने खळबळ उडाली आहे. ही कारवाई भडगाव तालुक्यातील बु.॥ तलाठी कार्यालयात शुक्रवारी दुपारी अडीच वाजता करण्यात आली. सलीम अकबर तडवी (44, भडगाव) असे लाचखोर तलाठ्याचे तर कविता नंदु सोनवणे (27, रा.तांदलवाडी, ता.भडगाव) असे अटकेतील महिला कोतवालाचे नाव आहे.
तलाठी कार्यालयात सापळा यशस्वी
भोरटेक गावातील 65 वर्षीय तक्रारदार यांची वडीलोपार्जित शेतजमीन भोरटेक बु.॥ तलाठी कार्यालयाच्या हद्दीमध्ये आहे. तक्रारदार यांचे वडील मयत झालेले असून या शेतजमिनीच्या सातबारा उतार्यावर तक्रारदार यांच्यासह सोबतच्या नऊ वारसांची नोंद घेण्यासाठी तलाठी यांनी यापूर्वीच 11 एप्रिल रोजी एक हजार रुपये लाच घेतली व त्यानंतर शुक्रवारी पुन्हा तलाठी व कोतवाल यांनी दिड हजारांची लाच मागितल्याने एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. शुक्रवारी महामानवाच्या जयंतीनिमित्त सुट्टी असलीतरी लाचखोर हे कामानिमित्त तलाठी कार्यालयात आल्याने त्यांनी कार्यालयात लाच स्वीकारताच अडीच वाजता त्यांना अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात नाईक ईश्वर धनगर, राकेश दुसाने, एएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळू मराठे, प्रदीप पोळ, सचिन चाटे, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने यशस्वी केला.