---Advertisement---

‘आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’, विधिमंडळात तीव्र पडसाद

---Advertisement---

मुंबई : धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे हालहाल करणाऱ्या, माता-भगिनींची अब्रू लुटणाऱ्या, मंदिरे उद्ध्वस्त करणाऱ्या क्रूर शासक औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तीव्र पडसाद उमटले. त्यामुळे विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू होताच. भाजपा आमदार योगेश सागर यांनी अबू आझमी यांच्या औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर भाजपाचेआमदार महेश लांडगे यांनीदेखील जोदार हल्ला चढवला. विधानसभेचे कामकाज सुरू होताच सत्ताधारी पक्षाने चांगलाच गदारोळ घालण्यास सुरुवात केली.

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी अबू आझमी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली, तर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी, ज्या औरंगजेबाने हदूंचे धर्मांतर केले, मंदिरे तोडली, महिलांना बाटवले, त्याचे गुणगान गाणाऱ्या माणसाला सभागृहात बसण्याचा अधिकार नाही. हे कायद्याचे सभागृह आहे.

आझमींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी केली. यादरम्यान झालेल्या प्रचंड गोंधळामुळे सुरुवातीला सभागृहाचे कामकाज विधानसभाध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकरांनी १० मिनिटांसाठी तहकूब केले.

त्यानंतरही गोंधळ सुरूच असल्याने तालिकाध्यक्षांनी १५ मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले. पुन्हा कामकाज सुरू झाले, तेव्हा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली.

यावेळी सत्ताधाऱ्यांनी सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जयच्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले होते. त्यामुळे विधानसभाध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दिवसभारासाठी तहकूब केले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment