तरुण भारत लाईव्ह ।२५ फेब्रुवारी २०२३। जळगाव- असोदा रस्त्यावरील मोहन टाकीजसमोर शुक्रवारी दोन घरांना आग लागली या आगीमध्ये दोन्ही घरातील संसारोपयोगी साहित्य खाक झाले. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ जाऊन आग आटोक्यात आणली.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव- असोदा रस्त्यावरील मोहन टॉकीज समोर शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दोन घरांना आग लागली. असोदा रोडवरील मोहन टॉकीजजवळ सुमन ओतारी, पमाबाई ओतारी यांची शेजारी शेजारी लाकडी पाट्यांचे पार्टेशनचे घरे आहेत. नेहमीप्रमाणे दोन्ही कुटुंबातील सदस्य कामासाठी शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. साडेनऊच्या सुमारास पार्टेशन घराच्या पाठी मागे असलेल्या लोखंडी चुलीत जळती राख असल्याने अचानकपणे पार्टेशनच्या एका घराला आग लागली. आगीत दोन्ही घरातील संसारोपयोगी वस्तू खाक झाल्या असून, शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी दोन्ही कुटुंबाने केली आहे.
स्थानिक नागरिकांनी तातडीने महापालिकेच्या अग्निशमन दलास घटनेची माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.