जम्मू-काश्मीरच्या गुलमर्ग येथे गुरुवारी सायंकाळपासून सुरक्षा जवान आणि अतिरेक्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत लष्कराचे जवान हुतात्मा झाले. अतिरेक्यांना हुडकून काढण्यासाठी जवानांनी व्यापक मोहीम उघडली असून, हेलिकॉप्टर आणि ड्रोनचीही मदत घेतली जात आहे.
गुरुवारी सायंकाळी बारामुल्ला जिल्ह्यातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गुलमर्ग येथील बोटा पाथरी भागात ही चकमक झडली. लष्कराचे वाहन नागिन पोस्टकडे जात असताना अतिरेक्यांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यात दोन जवानांना वीरमरण आले होते, तर अन्य दोन जवान जखमी झाले होते. या जखमी जवानांचा आज मृत्यू झाला, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली.
हा संपूर्ण परिसर लष्कराच्या ताब्यात असला तरी, अलिकडेच काही अतिरेक्यांनी सीमेपलीकडून घुसखोरी करीत, या भागातील उंच पहाडांवर आश्रय घेतला होता. बोटा पाथरी हा भाग अलिकडेच पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी वाढत्या दहशतवादी हल्ल्यांवर चिंता व्यक्त करताना, पाकिस्तानने सीमेपलीकडील कारवाया तातडीने थांबवाव्या, असे म्हटले आहे.
हेलिकॉप्टर्स, ड्रोन्सची मदत
जवानांवर हल्ला करून पळ काढणाऱ्या अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराने हेलिकॉप्टर्स आणि ड्रोन्स तैनात केले आहेत. याशिवाय, स्थानिक गुप्तचर यंत्रणाही कामी लागल्या आहेत. चकमकीच्या स्थळाची आणि आसपासच्या परिसराची संपूर्ण नाकेबंदी करण्यात आली असल्याचे लष्करी प्रवक्त्याने सांगितले.