इस्रोने प्रक्षेपित केलेल्या आदित्य एल-१ ची पहिली परिक्रमा पूर्ण

भारताची अंतराळातील पहिली सौर वेधशाळा आदित्य-एल १ ने सूर्य-पृथ्वी एल १ बिंदू‌भोवती पहिली परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण आहे. याबाबतची माहिती इस्रोने एक्सवर पोस्ट करीत दिली. आदित्य-एल १ ला २ सप्टेंबर २०२३ रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. ६ जानेवारी रोजी एल १ बिंदूभोवतीच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात आले. आता त्याने एल १ बिंदूभोवतीची हॅलो कक्षेतील पहिली परिक्रमा पूर्ण करून त्याचा वेग कायम ठेवण्याची क्षमता सिद्ध केली आहे.

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी तयार केलेल्या आदित्य-एल१ मिशनला एल १ बिंदूभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी अंदाजे १७८ दिवस लागतात. दरम्यान, या यानाला विविध अडचणींचा सामना करावा लागतो; ज्यामुळे ते त्याच्या इच्छित मार्गापासून विचलित होऊन भरकटू शकते. या अडचणींचा सामना करण्यासाठी आम्ही मिशनच्या सुरुवातीपासून तीन महत्त्वपूर्ण स्टेशन-कीपिंग सुधारणा केल्या आहेत, असे इस्रोने म्हटले आहे.

यानाच्या कक्षेत तीन सुधारणा
या यानाच्या कक्षेत पहिल्या दोन सुधारणा अनुक्रमे २२ फेब्रुवारी आणि ७ जून रोजी करण्यात आल्या. २ जुलै रोजी तिसरी सुधारणा करण्यात आली; ज्यामुळे अंतराळयानाचे एल १ भोवती त्याच्या दुसऱ्या प्रभामंडळ कक्षेतील संक्रमण सुनिश्चित झाले. आदित्य-एल १ ने सूर्य-पृथ्वी एल १ बिंदू‌भोवती त्याची पहिली परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या मोहिमेचे यश गुंतागुतीच्या गतिशीलतेच्या अचूक मॉडेलिंगवर अवलंबून आहे. हे घटक प्रक्षेपण ठरवण्यासाठी आणि अचूकतेने कक्षेत सुधारणेचे नियोजन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत, असे इस्रोने म्हटले आहे.

यान हॅलो कक्षेतच राहावे लागते, कारण…
एल-१ भोवतीची जी हॅलो कक्षा आहे, त्या कक्षेत अनेक प्रकारची शक्ती यानावर प्रभाव टाकत असतात. यामुळे यान नियोजित मार्गावरून विचलित होऊन भरकटू शकते. हे यान हॅलो कक्षेतच राहावे, यासाठी ठराविक कालावधीनंतर त्याचे इंजिन सुरू करावे लागते आणि त्याच्या मार्गात सुधारणा करावी लागत असल्याची माहिती इस्रोने दिली.