---Advertisement---

पंढरपूर मध्ये ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल उपक्रम’ ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटन

)पंढरपूर : केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल पंढरपूर २०२५’ या उपक्रमाचे रविवारी (२२ जून )पंढरपूर येथे रेल्वे मैदानावर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या उपक्रमांत ५ हजारांहून अधिक सायकलपटू सहभागी झाले होते. या सायकलपटूंनी १० लाख किलोमीटरहून अधिक अंतर पार करत देशातील सर्वात मोठ्या सायकल मेळाव्याचा विक्रम प्रस्थापित केला. महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेशातील ९० पेक्षा जास्त सायकलिंग क्लबमधून आलेल्या सायकलप्रेमींनी या उपक्रमात उत्साहाने सहभागनोंदविला. या सायकलस्वारांनी ४०० ते ४५० किलोमीटरचा सायकल प्रवास करत सोलापूर जिल्ह्यातील पवित्र वारी स्थळ पंढरपूर गाठले. पंढरपूर नगरीत त्यांनी नगर प्रदक्षिणा आणि पारंपरिक रिंगण सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला.

या उपक्रमाचे आयोजन भारतीय क्रीडा प्राधिकरण प्रादेशिक केंद्र –मुंबई व पंढरपूर सायकल वारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमात “फिटनेस का डोस – आधा घंटा रोज” या राष्ट्रीय घोषवाक्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या वेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयप्रकाश गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते पाटील, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे (IRS), आणि १९ वेळा आयर्नमॅन ठरलेले प्रसिद्ध एंडुरन्स सायकलस्वार डॉ. अमित समर्थ (नागपूर) यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व सायकलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, “सायकलिंग ही केवळ एक खेळाची किंवा व्यायामाची बाब नसून ती पर्यावरणस्नेही, आरोग्यवर्धक आणि शाश्वत जीवनशैलीचा भाग आहे. प्रत्येकाने फिटनेससाठी दररोज किमान अर्धा तास शारीरिक हालचाल करणे आवश्यक आहे. पंढरपूर सारख्या श्रद्धास्थळी हा उपक्रम पार पडणे म्हणजे अध्यात्म, आरोग्य व पर्यावरण यांचा सुंदर संगम आहे.”

रेल्वे मैदान ‘फिट इंडिया – संडे ऑन सायकल’अशा घोषणात चैतन्यशील व प्रेरणादायी वातावरणाने गजबजून गेले होते. सायकलिंगमुळे शाश्वत वाहतूक, सामूहिक आरोग्य आणि पर्यावरणाबाबत जागरूकतेचा संदेश समाजात रुजवला जात आहे. हा उपक्रम फिट इंडिया चळवळीला चालना देणारा ठरला आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment