जळगाव : जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. एकट्या नशिराबादमध्ये पाच रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे डेंग्यूंचा वाढता धोका पाहता नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद येथून जिल्हा शासकीय महाविद्यालय येथे पाठविण्यात आलेल्या रक्त नमुन्यामध्ये नशिराबाद येथील बारादरी मोहल्ला येथे ३ व मण्यारमोहल्ला येथे १ व निमगाव येथे १ असे पाच डेंग्यू रुग्ण आढळून आले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. बाळासाहेब वाबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. करिश्मा जैन, तालुका हिवताप पर्यवेक्षक चंद्रशेखर महाजन यांच्या नेतृत्वात आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांचे पथकामार्फत नशिराबाद गावात घरोघरी पाणीसाठे तपासणी करून डास अळी आढळून आलेली भांडी खाली करण्यात आली. अॅबेट टाकण्यात आले.
विमानतळावर सुरू होणार वैद्यकीय कक्ष
जळगाव : जळगाव विमानतळावर प्रवाशांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी नवीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात येणार आहे. डॉ. उल्हास पाटील रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय पथक प्राथमिक उपचार व रुग्णवाहिका सेवा देखील उपलब्ध असणार आहे. येत्या तीन ते चार दिवसात हा कक्ष कार्यान्वित होणार आहे.
जळगाव विमानतळावर दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असून प्रवाशांच्या सुविधेसाठी जळगाव विमानतळ प्राधिकरण देखील प्रवाशांना अधिक सुविधा देण्यासाठी कार्य करीत आहे. त्यानुसार विमानतळावर प्रवाशांना वैद्यकीय सुविधांची आवश्यकता भासल्यास त्यांना विमानतळावर तत्काळ प्राथमिक उपचार तसेच रुग्णवाहिका सेविका देखील उपलब्ध असणार आहे.
त्यामुळे विमानतळावर अथवा प्रवासादरम्यान प्रवाशाची प्रकृती बिघडल्यास त्वरित वैद्यकीय सेवा विमानतळावर मिळणार आहे. हे वैद्यकीय कक्ष तीन ते चार दिवसात सुरू होणार असल्याची माहिती जळगाव विमानतळ प्राधिकरणाकडून मिळाली आहे.
