Chalisgaon Crime News: बकऱ्या चोरणारी टोळीतील पाच जण अटकेत; दोघे फरार

चाळीसगाव :  धारदार शास्त्राचा धाक दाखवून पैसे लुबाडणे, दागदागिने घेण्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. परंतु, धारदार शास्त्राचा धाक दाखवून चक्क १९  बोकड व ७  बकऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे. याटोळीतील ५  जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १ लाख ३५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील चौकशीसाठी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

एका टोळीने धारदार शास्त्राचा धाक दाखवत चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे गावातील एका झोपडीतून १९  बोकड व ७  बकऱ्या यांची एका वाहनात टाकून नेत चोरी केली होती. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना ही चोरी  चाळीसगाव तालुक्यातील भवाळी गावातील चेतन गायकवाड याने केल्याची गुप्त माहिती मिळाली. यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भवाळी गाव गाठले. गावात पथकाने चेतन गायकवाड व त्याचे साथीदार यांना ताब्यात घेतले. पथकाने त्यांची चौकशी केली. या चौकशीत त्यांनी गुन्हा कबूल केला. ही चोरी चेतन गायकवाड यांच्यासह त्याचे साथीदार गोरख फकीरा गायकवाड, बबलू आबा जाधव, गोरख सुरेश गोकुळ, सोमनाथ भिकन गायकवाड, गोकुळ गायकवाड आणि शंकर मोरे सर्व रा.भवानी ता. चाळीसगाव यांच्या सोबत केल्याचे सांगितले.
या सातजणांपैकी पाच जणांना अटक करण्यात आली असून  गोकुळ गायकवाड आणि शंकर मोरे हे दोघे फरार झाले आहेत.

अटक करण्यात आलेल्या पाच जणांकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि रोकड असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील, हिरालाल पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, महेश पाटील, सागर पाटील, ईश्वर पाटील, दीपक चौधरी यांनी केली आहे. अटकेतील पाचही जणांना पुढील चौकशीसाठी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.