…मधील पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती केव्हाही बरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला.

मुंबई : लंडनमधील पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती केव्हाही बरी, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शेती करण्यावर ठाकरेंनी टीका केली होती. यावर आता शिंदेंनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “शेतकऱ्यांचं दु:ख समजून घ्यायला शेतावर जावं लागतं, चिखल तुडवावा लागतो. घरी बसून सगळ्या गोष्टी समजत नाही आणि वर्क फ्रॉम होम चालत नाही. लंडनमधील पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती केव्हाही बरी,” असे ते म्हणाले.

“काही लोकं छाती ठोकून पुढे येताना दिसत आहेत. गिरे तो भी टांग उपर असं आपण म्हणतो. एवढं खोटं नरेटिव्ह पसरवून आम्ही तुमचा पराभव केला आहे. जनतेने नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवलं याचा आनंद विरोधक साजरा करत आहेत. कोण कोणाला निरोप देईल हे येणारा काळ ठरवेल. हे सगळं जनतेच्या हातात असतं. जनताच सगळं ठरवत असते. त्यामुळे हे अधिवेशन आमच्यासाठी निर्धाराचं आणि निश्चयाचं आहे. दोन वर्ष केलेल्या कामगिरीच्या जोरावर पुन्हा महायूतीचं सरकार आणण्याच्या निश्चयाचं हे अधिवेशन आहे,” असेही ते म्हणाले.

तसेच पुणे पोलिस आयुक्तांना पब, हॉटेल, टपऱ्या आणि ड्रग्जशी संबंधित वास्तूंवर बुलडोजर चालवण्याचे आदेश पुणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात ही कारवाई करण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी सांगितले.