Dhule Crime News: मालेगाव येथील चोरट्यांकडून रिक्षांसह पाच दुचाकी जप्त ; चाळीसगाव रोड पोलिसांची कामगिरी

भुसावळ / धुळे : धुळे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात अॅटो रिक्षा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. या अॅटो रिक्षा चोरीतील गुन्हेगारांना पकडणे पोलिसांना आव्हान ठरले होते. अशाच अॅटो रिक्षा चोरी प्रकरणात चाळीसगाव रोड पोलिसांनी चोरट्यांचा सीसीटीव्हीच्या साहाय्याने माग काढत त्यांना शिताफीने अटक केली. या चोरट्यांच्या टोळीत एक अल्पवयीनांचाही समावेश आहे.

धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिसांनी अॅटो रिक्षा चोरीच्या तपासात मालेगावातील अट्टल चार चोरट्यांच्या टोळीला बेड्या ठोकल्या असून त्यातील एक अल्पवयीन आहे. आरोपींच्या ताब्यातून तब्बल चोरी केलेल्या नऊ अॅटो रिक्षा व पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपींनी धुळे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातून या वाहनांची चोरी केल्याची कबुली दिली असून वाहनांच्या चेसीस क्रमांकावरून वाहनांची ओळख पटवली जात आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगाव रोड हद्दीतील अबुल हसन रियाज अहमद अन्सारी (५६, तला मशीद, फिरदोस नगर, धुळे) यांच्या मालकीची अॅटो (एमएच १५ एफयू २२) २ ऑक्टोबर रोजी चोरीला गेली होती. सीसीटीव्ही फुटेजद्वारा पोलिसांनी आरोपींचा माग काढला. सुरूवातीला आवेश अहमद आबीद अहमद, फैजान असरफ सिराज असरफ व अन्य एका अल्पवयीनाला (सर्व रा. मालेगाव, जि. नाशिक) ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून दोन लाख ३० हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. संशयीतांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली तर अन्य आरोपी अजीजोद्दीन रहेमान मोहम्मद अकील अन्सारी (मालेगाव) याच्या ताब्यातून तब्बल चोरी केलेल्या १५ लाख ७५ हजर रुपये किंमतीच्या नऊ अॅटो रिक्षा जप्त करण्यात आल्या.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहा. निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे, उपनिरीक्षक हरीश्चंद्र पाटील, हवालदार सुनील पाथरवट, अविनाश वाघ, शोएब बेग, आतीश शेख, विनोद पाठक, सिराज खाटीक, सचिन पाटील, संदीप वाघ, सारंग शिंदे, सूर्यकांत भामरे आदींच्या पथकाने केली.