समाजसेवेची ज्योत तेवत ठेवणारे मदनजी !

जळगाव येथे २२ जुलैला जळगावच्या क्षुधा शांती केंद्रात सर्वश्री राजेश पांडे, संजय बिर्ला, रत्नाकर पाटील यांच्यासमवेत बसलो असताना मी राजेशकडे मदनजींच्या प्रकृतीबद्दल चौकशी केली. राजेशने ‘आता काही खरं नाही’ असं म्हटल्यावरच गलबलून आलं अन् दि.२४ला ही धक्कादायक घटना घडली!

१९७९मध्ये नाशिक येथील अभिनव भारत मंदिर व दुर्गा मंगल कार्यालयात झालेल्या प्रदेश अभ्यासवर्गात मदनजींची पहिली भेट झाली. एक धीरोदत्त गंभीर चेहर्‍याचे, पण तेवढेच मृदु स्वभावाचे, कार्यपध्दतीविषयी अत्यंत आग्रही असलेल्या मा.मदनजींचा लौकीक परिचय झाला. एम.कॉम.,एल.एल.बी. (विशेष प्रावीण्य) व सी.ए. (सुवर्णपदक प्राप्त) व १९९६ पासून पूर्णकालीक असा त्यांचा परिचय मनावर खोलवर जावून बसला तो एक नितांत आदर म्हणून !
या वर्गात सर्वश्री यशवंतराव, प्रा. बापू केंदुरकर, सुरेशराव मोडक, बाळासाहेब आपटे, अशोकराव मोडक, अनिरूध्द देशपांडे, मदनजी ही सर्वच दिग्गज मंडळी होती.

नुकतेच सर्वजण मिसाबंदी म्हणून तुरूंगातून तर मुक्त झालेच पण हुकुमशाही प्रवृत्तीला लोकशाही पध्दतीने झुगारून सर्व देश मोकळा श्वास घेतोय याचा आनंद सर्वच घेत होते. आता नव्या दमानं प्रत्येक महाविद्यालयांत अ.भा.वि.प.चं काम सुरू करायचं या उत्साहात सर्वजण या वर्गात सहभागी झाले. वर्गाच्या दुसर्‍या दिवशी शेवटच्या वर्षाची परीक्षा दिलेल्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत देशाची सद्य:स्थिती आपल्या कामाची आवश्यकता असा विषय मांडून मा. मदनजींनी जे कार्यक़र्ते पदवीधर होतील त्यांनी परिषद कामासाठी काही वर्षे पूर्णवेळ काम करावे, असे आवाहन केले.

बैठकीनंतर रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या पैलूंवर चर्चा चालली, आमची पहिलीच भेट असल्यामुळे माझी कौटुंबिक परिस्थिती मदनजींनी जाणून घेतली व झोपायला जाण्यापूर्वी माझ्या खांद्यांवर हात ठेवून तू पण पूर्णवेळ जाण्याचा विचार कर, असे म्हटले एम.कॉम. करण्याचा मनोदय मी व्यक्त केल्यावर म्हटले हरकत नाही, त्यानंतर विचार करू या असे ठरले. दुर्दैवाने मला पूर्णवेळ निघता आलं नाही त्यानंतर बैठकीच्या वेळी मदनजींजवळ त्याबद्दल खंत व्यक्त करत होतो. त्यावर मदनजी म्हटले अरे दिलीप सर्वांनी पूर्ण वेळ काम केलं पाहिजे असे नाही, कुटुंबात राहून परिषद कामात अधिक वेळ देणारेही कार्यकर्ते हवेत ना?, तुला पूर्णवेळ निघता आले नाही तरी वैषम्य न ठेवता अधिक वेळ देवून काम करता येईल, असं नियोजन कर, अनेक वर्षे हे काम आपल्याला करावे लागणार आहे असं म्हणत पाठीवर हात ठेवून ‘नही रूकना नही थकना, सतत चलना, सतत चलना’ ही ओळ लक्षात ठेव अन काम करत रह.,

असे ते म्हणाले. मदनजींनी आयुष्यभरासाठी जणू काय मंत्र दिला, पण पूर्णवेळ निघता आले नाही. याचा जो त्रागा वाटत होता, तो एकदम दूर झाला, अनं मी पटकन मदनजींना म्हटलं हो नक्की, एम.कॉम.ची परीक्षा महिन्याभरावर असताना मदनजी म्हटले, असे दिलीप बिझनेस ऍडमिनिट्रेशन हा विषय म्हणजे अ.भा.वि.प.ची कार्यपध्दती आहे, त्या दृष्टीने तू अभ्यास कर खरं म्हणजे मदनजींनी ही सूचना केल्यावर मी या पेपरचा अभ्यासक्रम नीट पाहिला, तर खरंच लक्षात आल की, परिषदेची कार्यपध्दती हीच तर आहे, अशी दृष्टी देण्याचं काम सहजपणे मदनजी करीत असत. १९८३ साली त्यांचा जळगावात प्रवास होता, सकाळच्या सत्रात परिषदेच्या काही हितचिंतकांच्या भेटी ठरवल्या होत्या. या तिन्ही बैठकीत प्रत्येक ठिकाणी अवघ्या ५ ते ७ मिनिटात देशभरातील परिषद काम विशेषत: ईशान्य भारतातील तत्कालीन स्थिती अशाप्रकारे कथन केली की असे वाटे की आपण प्रत्यक्ष आसाममध्ये आहोत.
ज्या हितचिंतकांच्या भेटी ठरवल्या होत्या, हे सर्व हितचिंतक विद्यार्थी परिषदेचे कायमस्वरूपी आधारस्तंभ झालेत. संथपणे पण आग्रही विषय मांडण्याची हातोटी काही औरच होती. ‘पूर्णवेळ कार्यकर्ता ही तात्पुरती व्यवस्था आहे, खरं काम स्थानिक कार्यकर्त्यांनीच करावे यासाठी ते आग्रही असत. एखाद्या कार्यकर्त्यालाही रागावल्यानंतर थोड्या वेळाने स्वत: त्या कार्यकर्त्याशी बोलत, गप्पा मारत, थोड्या वेळापूर्वी रागावणारे हेच मदनजी का? असा प्रश्न कार्यकर्त्याला पडत असे.
मदनजी बैठकीत असले की, कार्यकर्त्यांना एक नैतिक दडपण, धाक वाटायचा. छोटी छोटी उदाहरणं सांगून सहजपणे विषय कसे पूर्ण करता येतील याचा पाठ ते कार्यकर्त्यांना देत असत. २०१७ साली मुंबईच्या यशवंत भवनमध्ये सहकार भारतीची प्रदेश बैठक होती. योगायोगाने मदनजी तेथे आहेत असे कळले.

सहकार भारतीचे संस्थापक स्व.लक्ष्मणराव इनामदार जन्मशताब्दीनिमित्त अधिक वेळ देवून प्रवास करणार्‍या कार्यकर्त्यांची घोषणा करायची होती. मदनजींच्या उपस्थितीत ही घोषणा करावे असे मनात आले. भेटून त्यांना विनंती केली, त्यावर मदनजी म्हणाले, अरे अशी योजना तुम्ही केली खूप चांगले केले, अन मला यात साक्षीदार होण्याचा बहुमान देत आहात याशिवाय दुसरा आनंद काय असू शकतो? कार्यकर्त्यांनी सांगितलेलं ऐकलंच पाहिजे असं म्हणत त्यांनी उपस्थित राहण्याचं मान्य केल. स्वास्थ ठीक नसतांनाही ते आलेत अधिक वेळ देणार्या कार्यकत्यांची घोषणा झाली त्यानंतर मदनजींनी २० मिनीटे वेळेचं नियोजन कसं करावं याविषयी मार्गदर्शन केले.

माझ्या वडिलांच्या निधनानंतर आलेले सांत्वनपर पत्र तसेच मुग्धा व विक्रांतच्या शुभविवाहप्रसंगी प्रवासात असताना आठवणीने पाठविलेले शुभेच्छा पत्र आमच्या कुटुंबियांसाठी ‘अमोल ठेवा’ आहे. प्रत्येक भेटीत कुटुंबियांची चौकशी करणारे मदनजी सतत स्मरणात राहतील. परत जाताना मला म्हणाले, दिलीप तुझे नाव या यादीत नाही, पण तू अधिक वेळ देणारा अघोषित कार्यकर्ता आहेस हे विसरू नकोस, शारीरिक यातना होत असताना कार्यकर्त्यांच्या हाकेला ओ देणारे मदनजी उपस्थित राहून प्रेरणादायी मनोगत व्यक्त करणारे मदनजी!, कार्यकर्त्यांनी सतत कामात गुंतले पाहिजे म्हणून अधिकाराने सांगणारे मदनजी! शेवटच्या क्षणापर्यंत संघविचाराप्रती दृढ निश्चयी असणारे मदनजी! देशभरातील असंख्य कार्यकर्त्याना सातत्यपूर्वक कामात जोडणारे मदनजी सर्वच क्षेत्राात काम करणार्या कार्यकर्त्यांना समाजसेवेची ज्योत अखंडपणे तेवत ठेवण्याची ती ज्योत कधीही विझू न देण्याची सतत प्रेरणा देत राहतील. ‘चरैवेती चरैवेती यही तो मंत्र है अपना’ हे गीत नेहमी असंख्य कार्यकर्त्यांना मदनजींचे स्मरण करून देत राहील, यात शंकाच नाही! त्याच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

-दिलीप रामू पाटील (धरणगाव), राष्ट्रीय संपर्कप्रमुख, सहकार भारती