---Advertisement---
जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यात गिरणा उगम क्षेत्रात दमदार पावसामुळे गिरणा नदीला महापूराची स्थिती आलेली आहे. गिरणा प्रकल्पाचे 8 दरवाजे उघडून 20 हजाराहून अधिक क्यूसेकचा विसर्ग केला जात आहे. नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये अथवा पशुधन बांधू नये, पाण्याची आवक पहाता विसर्गात वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
गिरणा प्रकल्प व नदी पाणलोट क्षेत्रात दोन तीन दिवसापासून दमदार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासात 80 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच गिरणा नदी उगम क्षेत्रात चणकापूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात 85 मिलीमिटर पावसामुळे आवक वाढली आहे. त्यामुळे चणकापूर प्रकल्पातून 17 हजार 997 क्यूसेकचा विसर्ग होत आहे. याशिवाय अर्जूनसागर पुनद प्रकल्पातून 2040, ठेंगोडा बंधारा 4528, हरणबारी 854, नागासाक्या 636, केळझर 388, आणि मन्याड धरणावरील माणिकपुंज प्रकल्पातून सुमारे 5000 क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे. त्यानुसार गिरणा मोठया प्रकल्पात गेल्या 24 तासात 14.11 दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक होत असल्याने गिरणा प्रकल्पाचे सहा दरवाजे 60 आणि 4 दरवाजे 30 सेंटीमिटर असे 10 दरवाजे उघडून 20 हजाराहून अधिक क्यूसेकचा विसर्ग केला जात आहे.
गिरणा नदी पाणलोट क्षेत्राच्या उपनद्या तसेच प्रकल्पानंतर तितूर, हिवरा, बहुळा आदि उपनद्यामधून देखील 10 हजाराहून अधिक क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जळगाव शहरानजीक गिरणा नदीला महापूराची स्थिती आलेली असल्याचे दिसून आले आहे.
मन्याड धरणावरील नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज प्रकल्पातून सुमारे 5000 क्युसेक्स तसेच पाणलोट क्षेत्रामधील हातगाव, राजदेहरे, देश नाला, लोकल स्थानिक नाले, पाझर तलाव यांचा विसर्ग असे अंदाजे 14000 ते 15000 क्युसेक्स विसर्ग पाणी मन्याड धरणात तसेच सांडव्या वरून नदीत मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तरी नदी काठावरील नागरिकांना तसेच कोणत्याही प्रकारचे जीवित, वित्तीय हानी नुकसान होणार नाही याची काळजी घेत पशुधन, चीज वस्तू, शेती मोटार पंप सुरक्षित स्थळी न्यावे असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे गिरणा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता हर्षल पिटे यांनी म्हटले आहे.
---Advertisement---