---Advertisement---
जळगाव : सकाळी कडकडीत उन्हाचा कहर असताना दुपारी ढगाळ वातावरण झाले. त्यानंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जळगाव शहरासह अनेक भागात अचानक हजेरी लावली. या अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शिरसोली परिसरातील फुलबागांचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे आणि पावसाच्या तडाख्यामुळे अनेक ठिकाणी फुलांची लागवड अक्षरशः जमिनदोस्त झाली आहे.
सध्या सण-उत्सव आणि लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने फुलांची मागणी वाढलेली असताना हे नुकसान झाल्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून ते अडचणीत सापडले आहेत.
या अवकाळी पावसामुळे पूर्णपणे तयार झालेली फुले बाजारात येण्याआधीच नष्ट झाली आहेत. परिणामी, अपेक्षित उत्पन्नावर पाणी फिरल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने ३० आणि ३१ मार्च रोजी जळगाव जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मंगळवारीही वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.









