फुले मार्केटमधील अतिक्रमणांना मनपाकडून अभय

तरुण भारत लाईव्ह  न्यूज :  शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या महात्मा फुले मार्केटमध्ये अस्ताव्यस्त पसरलेल्या किरकोळ विक्रीच्या दुकानांमुळे नागरिक, महिला व त्यांच्यासोबत आलेल्या लहान मुलांना प्रचंड त्रास होत असतो, तर मार्केटमध्ये असलेल्या दुकानदारांनी आपल्याच ओट्यांवर काही लहान दुकानदारांना भाडे तत्वावर जागा दिल्याने शहरातील गजबजलेल्या भागात महात्मा फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केट आहे आहे. यातील महात्मा फुले मार्केटमध्ये 259 तर सेंट्रल फुले मार्केटमध्ये 648 अशी दोन्ही मार्केट मिळून 907 गाळे आहेत. या सर्व गाळ्यांमध्ये स्वतः दुकानदार आपापला माल विकतात, तर यातील महात्मा फुले मार्केट मधल्या दुकानदारांनी आपले दुकानांचे बाहेर असलेले ओटेदेखील भाडे तत्वावर दिल्याची माहिती समोर आली आहे. या ओट्यांवर लहान दुकानदार व्यवसाय थाटून आहेत.
पार्किंगच्या जागेत दुकाने

यामुळे अनेकदा मार्केटमध्ये दुचाकी उभे करण्यासाठी असलेल्या जागेत बळकावल्या जातात आणि मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी आलेल्या दुकानदारांना इतरत्र आपली वाहने लावावी लागतात. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी दिसते. अगदी आत जाण्यासाठीही कसरत करावी लागत असते. यामुळे अनेकदा दुचाकीधारकांचे वादही होताना दिसतात.

पोलीस स्टेशनमध्ये लागतात वाहने

अनेक ग्राहक आपली ओळख आहे म्हणून आपल्या दुचाकी शहर पोलीस स्टेशनमध्ये लावून फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी जातात. त्रस्त पोलिसांकडून बर्‍याच जणांना यामुळे समज द्यावी लागते. तर मार्केट बाहेरून अनेकदा दुचाकी चोरी जाण्याचे प्रकारही घडत असतात. या परिस्थितीचा त्रास होतो तो फक्त ग्राहकांनाच. जे दुकानदार या ओटेधारकांना पैसे देतात ते दुकानदारदेखील आपल्या वस्तू अव्वाच्या सव्वा दराने विकतात. यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागते आणि शहरातील गर्दीच्या रस्त्यावर अतिक्रमणाचा विळखा झालेला दिसून येतो. यामुळे मार्केटमध्ये असलेल्या दुचाकी पार्किंगच्या जागेवरील अतिक्रमणे काढण्याची मागणी होत आहे. याकडे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग व शहर वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे दिसते.

मार्केटच्या दोन्ही बाजुंना गाड्यांचा विळखा

फुले मार्केटच्या बाहेर कॉग्रेस भवनाच्या समोरील भागात सायंकाळी अर्ध्या रस्त्यावर दुचाकी उभ्या असतात तर अर्धा रस्ता ऑटोरिक्षाधारकांनी व्यापलेला असतो. या ऑटोरिक्षा उभे करणार्‍यांनाही कुणाचाच धाक नाही. जैन मंदिर परिसरातही अनेक व्यावसायिक गर्दी करून असतात. यामुळे प्रचंड रहदारीच्या या रस्त्यावर वाहतुकीची सतत कोंडी होत
असते.