तरुण भारत लाईव्ह न्युज :जळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशनची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार, जिल्ह्यातील मेडिकल व्यावसायिकांचा त्रास थांबेना अन्न औषध प्रशासनाकडून क्षुल्लक कारणावरून पैसे मागितल्याच्या तक्रारी मेडिकल व्यावसायिकांनी केल्या आहेत. मेडिकल तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी आल्यानंतर ते त्या परिसरातील इतर मेडिकल व्यावसायिकांकडून पैसे घेत असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर मेडिकल चालकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार संशयाच्या भोवर्यात सापडला आहे.
जळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशनने अन्न व औषध प्रशासनाकडून होणार्या कारवाईसंदर्भात ग्रामविकास तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना पत्र देऊन कैफियत मांडली होती. मेडिकल व्यावसायिकांकडून अन्न व औषध प्रशासनाकडून होणारी वसूली तातडीने थांबविण्याची मागणी याव्दारे करण्यात आली आहे. जिल्ह्यात विशिष्ट दलालांमार्फत अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी कारवाईचा धाक दाखवून ही वसुली करीत असल्याचे मेडिकल व्यावसायिकांचे म्हणणेे आहे. त्यामुळे याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून दखल होणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाकडून होणार्या कारवाईमुळे मेडिकल व्यावसायिक त्रस्त झाल्याचे दिसून येते.
याबाबत त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार करूनही या व्यावसायिकांना त्रास देण्याचा प्रकार थांबत नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर याची गंभीर दखल घेतली जावी अशी अपेक्षाही औषध विक्रेत्यांकडून केली जात आहे.
आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार रॅन्डमली पध्दतीने मेडिकल व्यवसायिकांची तपासणी केली जाते. त्यात मी स्वत:हून कुठल्याही मेडिकलची तपासणी करीत नाही. महिन्याला 10 दुकानांची तपासणी यादी पळल वर प्राप्त होते. त्यानुसार कारवाई होते. शुल्लक कारणावरून कारवाई होत नाही. आयुक्त कार्यालयाकडून तपासणीचे टागेॅट दिले जाते. त्यामुळे कारवाई करणे क्रमप्राप्त आहे. कुणाकडे पैसे मागितल्याची तक्रार असेल तर त्यांनी पुराव्यानिशी सादर करावी.
– अनिल माणिकराव, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग
अन्न व औषध प्रशासनाकडून सर्वसामान्य केमिस्टला त्रास दिला जातो. शुल्लक कारणावरून कारवाई केली जाते. धुळीच्या कारणावरून सुध्दा परवाने निलंबित करण्यात येतात. आमची संघटना नेहमी केमिस्ट बांधवांच्या तक्रारीसंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाशी चर्चा करीत असते. मात्र या विभागाकडून काहीही ऐकून घेतले जात नाही. याबाबत रितसर कार्यवाही अन्न व औषध प्रशासन विभागाकडून व्हायला हवी. या विभागाकडून केमिस्ट बांधवांना सूचना देण्यात याव्यात. त्रुटी असतील तर अन्न व औषध प्रशासनाकडून त्यात सुधारणा करण्याची संधी केमिस्ट बांधवांना दिली गेली पाहिजे. शिक्षा नको तर शिक्षण दिले जायला हवे.
– अनिल झंवर, सचिव, जळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशन