जळगाव । पाळधी (ता. धरणगाव) येथे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शिंपी कुटुंबियांवर संकट आले. मंगळवारी रात्री समाजकंटकांनी महेश शिंपी यांच्या बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर असलेले फुटवेअरचे दुकान जाळून टाकले. विशेष म्हणजे, त्यांच्या मुलीच्या लग्नाआधीच्या हळदी समारंभाच्या दिवशीच ही घटना घडली.
महेश शिंपी यांची लेक २ जानेवारीला नाशिकमध्ये विवाहबद्ध होत आहे. त्यामुळे कुटुंब सणासुदीसारख्या आनंदात होते. मात्र नियतीने त्यांच्या आनंदावर काळाचा गडद रंग फासला. दुकान जाळून टाकल्याने शिंपी कुटुंबाची रोजीरोटी हिरावली गेली असून त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे.
घटनेने शिंपी कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. आपल्या मुलीच्या कन्यादानासाठी त्यांना आता मदतीसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. “सरकारने तातडीने पंचनामा करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि आर्थिक मदत करावी,” अशी मागणी महेश शिंपी यांनी केली आहे.
नेमकी घटना काय ?
पाळधी, ता. धरणगाव येथे वाहनाचा कट लागल्यावरून वाद पेटत दंगल होऊन दुकाने व वाहनांची जाळपोळ झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी, ३१ डिसेंबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजता घडली. या दंगलीत एकूण ६३ लाख २८ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, ११ दुकाने आणि ४ वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या प्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अज्ञात २०-२५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद जावेद पथरू पिंजारी (वय ४०, रा. बागवान मोहल्ला, पाळधी) यांनी पाळधी पोलीस ठाण्यात दिली. फिर्यादीवरून अज्ञात २० ते २५ जणांविरोधात दंगली, तोडफोड आणि जाळपोळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास धरणगाव पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले करीत आहेत. या घटनेमुळे पाळधी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी सुरक्षेच्या उपाययोजना वाढवल्या आहेत.