जळगाव : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे रावेर, यावल, सावदा, चोपडा या परिसरात केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी या नुकसानीची माहिती सादर करूनही त्यांना अद्यापपर्यंत भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे आता विमा कंपनी अधिकाऱ्यांना शिंगाडे दाखविण्याची वेळ आली आहे. दरम्यान नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचा अंत पाहू नका असा गर्भित इशारा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी नुकसानीमुळे मेटाकुटीला आला आहे. आसमानी संकटासह सुलतानी संकटांचा देखिल शेतकऱ्याला सामना करावा लागत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार पंचनामे पूर्ण करण्याची प्रक्रिया झाली आहे. तसेच विमा कंपन्यांना देखिल नुकसानीबाबतची माहिती देण्यात आली आहे. मागील आठवड्यात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व मदत आणि पुर्नवसन मंत्री ना. अनिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनासह विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी देखिल शासनस्तरावर यासंबंधी पाठपुरावा केला होता. बैठकीत पालकमंत्र्यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. तरी देखिल विमा कंपन्याकडून अद्यापही नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही.
77 हजार शेतकऱ्यांनी काढला विमा
जळगाव जिल्ह्यात 81 हजार 642 हेक्टर क्षेत्रासाठी 77 हजार 920 शेतकऱ्यांनी एआयसी अर्थात ॲग्रीकल्चरल इंशुरंस कंपनीकडून केळी पिक विमा काढला आहे. हे सर्व शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत. तसेच नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीतही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पडताळणी न करता केळी उत्पादकांना तातडीने मदत करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र तरी देखिल विमा कंपन्यांनी यााबाबत कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतले आहे. त्यामुळे विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना आता शिंगाडेच दाखविण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा अंत न पाहता तातडीने भरपाईची रक्कम द्यावी असा गर्भित इशाराही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.