स्वधर्मासाठी जगावं आणि स्वराष्ट्रासाठी मरावं, असा भारताने जगाला संदेश दिला!

जळगाव : स्वधर्मासाठी जगावं आणि स्वराष्ट्रासाठी मरावं, असा गीतेतील संदेश भारताने जगाला दिला आहे, असे मौलिक विचार विद्यावाचस्पती गुरुदेव प. पू. डॉ. शंकरजी अभ्यंकर यांनी शुक्रवारी आपल्या प्रवचनात व्यक्त केले.

केशवस्मृती सेवासंस्था समूह आणि जळगाव जनता सहकारी बँक यांच्यातर्फे शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात आयोजित जाहीर प्रवचनात ते बोलत होते. 18 ते 20 नोव्हेेंबरपर्यंत तीन दिवस सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळात हे प्रवचन होत आहे.

प. पू. डॉ. शंकरजी अभ्यंकर पुढे म्हणाले की, दैनंदिन जीवनात गीतेचा उपयोग काय? हा प्रश्न अनेकांना सतावतोय. आहार माणसाला जन्मापासून मृत्यूपर्यंत सुटत नाही. माणसाला परमेश्वराने बुद्धी दिली, ती कोणत्याही प्राण्याला दिली नाही. कुंभकर्णाला माणसं हसतात, पण माणसाचं अर्धे आयुष्य निद्रेतच जाते. सर्व गोष्टींना भय आहे. पण वैराग्याला भय नाही.

यदा यदा धर्मस्य ग्लानी… हा संस्कृतमधील श्लोक सांगताना ते म्हणतात, धर्माला ग्लानी येत नाही. आम्हाला संस्कृत येत नाही म्हणून आम्हाला ग्लानी येते. या वचनाचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. धर्माला ग्लानी आणि धर्माची ग्लानी यात मोठा फरक आहे. धर्माला कधीही ग्लानी येत नाही. पण लोकांना धर्माची ग्लानी येते. सदाचार, नीती हा सगळा गाभा माणसं जेव्हा विसरतात तेव्हा सज्जनाला जगणं अशक्य होतं. धर्म हा तेजोमयच आहे. गीतेची व्याप्ती पाहिल्यावर माणूस थक्क होतो. गीता जन्माला आली तो प्रसंगच अद्भुत आहे. भगवंताने अर्जुनाचे निमित्त करून तुमच्या-आमच्यासाठी अमृताचा कलश गीतेच्या माध्यमातून दिला आहे. सेवन कराल तर कृतार्थ व्हाल. गीतेची व्याप्ती आणि खोली पाहिल्यावर मन आश्चर्याने थक्क होऊन जाते. तत्त्वज्ञानाची मुकुटमणी म्हणजे श्रीमद् भगवत गीता होय.

दैनंदिन जीवनातील गीतेची माहिती

केशव संस्कृती सेवा संस्था समूहाचे अध्यक्ष भरत दादाअमळकर यांनी प्रास्ताविक केले. समाजातील सात्विकता कमी होते तसा समाजातील तणाव वाढतो. तणाव वाढून आपलं जीवन रोगी आणि दुःखी होते . त्यामुळे सात्विकतेचे झरे मधून मधून उघडे ठेवले पाहिजे. ते आपल्या अंतकरणात जाऊ दिले पाहिजेत . जेणेकरून आपलं काही कल्याण व्हायचं असेल तर ते आपलं स्वतःचं नक्की होईल. असं आपण मानतो . हल्ली विविध माध्यमातून सर्वांच्या कानावरून गीता वेगवेगळ्या स्वरूपात जात असते त्यात दैनंदिन जीवनातील गीतेची माहिती व्हावी यासाठी या जाहीर प्रवचनाचे नियोजन केले आहे. असेही अंमळकर यांनी सांगितले.

स्वामी विवेकानंदांवर पीएच. डी.केलेले देशातील पहिले विद्वान

आदित्य प्रतिष्ठानच्या प्रतिनिधी अपर्णा अभ्यंकर यांनी आदित्य प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल माहिती कार्याची माहिती दिली. स्वामी विवेकानंदांचे शैक्षणिक विचार या विषयावर परमपूज्य डॉ. शंकरजी अभ्यंकर यांनी पीएच. डी. केली आहे. स्वामी विवेकानंदांवर पीएच. डी. केलेले ते पहिले विद्वान ठरले आहेत. त्यांना देशातील चार विद्यापीठांकडून चार डी. लीट. (साहित्याचे धन्वंतरी) पदव्या मिळाल्या आहेत. विविध विषयांवर त्यांनी 70 ग्रंथ लिहिले आहेत. हे ग्रंथ केवळ 13 हजार रुपयांकडून देण्यात येत आहेत. यासोबतच विविध ग्रंथ हे सवलतीच्या दरात व्याख्यानमालेपुरते देण्यात येत आहेत. हे ग्रंथ आपण इतरांना भेट देऊ शकतात. कार्यक्रम स्थळी ठेवलेल्या ग्रंथांचे अवश्य अवलोकन करावे, असे आवाहनही आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

खोटं द्युत खेळून पांडवांना फसवले ही कबुली शकुनी याने दिली आहे. आपणहून कोणावर आक्रमण करू नये. पण आमच्या माता भगिनींचा अवमान कोणी करीत असेल तर त्याचा प्रतिकार केलाच पाहिजे, असे आमचे शास्त्र सांगते.

युद्धाचे दोन प्रकार आहेत. वृत्तीफलक युद्ध आणि धर्मफलक युद्ध. सत्ता पाहिजे म्हणून वृत्ती फलक युद्ध केली जातात. यात वडिलांच्या विचारांचे श्राद्ध घालावे लागले तरी चालू शकेल. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. सत्ता, संपत्ती, भूमी, स्त्री आणि इंधन यासाठी वृत्तीफलक युद्ध होते. स्त्रिचा सन्मान करण्यासाठी, सदाचाराची जोपासना करण्यासाठी जे युद्ध केलं जातं ते धर्मफलक युद्ध होय. पांडवांचे युद्ध हे धर्मफलक युद्ध होय. जग लढलं ते वृत्तीफलक युद्धासाठी लढलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवलेला नाही. जिहाद, आतंकवादी कसाही, कुठेही घाला घालतात. आपण स्वत:हून शेजारच्या राष्ट्रावर कुठेही आक्रमण केलेले नाही. ‘धर्मासाठी जगावं आणि स्वराष्ट्रासाठी मरावं,’ असे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले.

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांनी परमपूज्य डॉ. शंकरजी अभ्यंकर यांचा सत्कार केला. भानुदास येवलेकर यांनी सूत्रसंचालन केले. व्याख्यानास जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अनिल राव यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.