मुंबईत धाडसत्र सुरूच; महापालिकेच्या कार्यालयात ईडीकडून छापेमारी

 महाराष्ट, मुंबई : मुंबई महापालिकेने कोविड काळात केलेल्या खर्चाची आणि उभारलेल्या कोविड सेंटर्सच्या उभारणीतील कथित गैरव्यवहारांची ईडीकडून सध्या कसून चौकशी केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत ईडीचे छापासत्र सुरु असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह ठाकरे गटाच्या नेत्यावर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहेत. दि. २२ जून रोजी सलग दुसऱ्या दिवशीही ईडीकडून मुंबईत छापेमारी सुरु होती. मुंबई महापालिकेच्या भायखळ्यातील कार्यालयासह इतर दोन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी छापेमारी करण्यात आली. दि. २१ जून रोजी सुरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी ईडीने तब्बल १७ तास प्रदीर्घ चौकशी केल्याने या प्रकरणातून मोठे धागेदोरे हाताला लागल्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोविड काळात करण्यात आलेला खर्च आणि त्यात झालेला कोट्यवधींचा भ्रष्टाचार हा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून मुंबईच्य राजकीय वर्तुळात गाजत आहे. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने ईडीकडून मुंबईत छापेमारी सत्राला सुरुवात करण्यात आली आहे. दि. २१ जून रोजी झालेल्या छापेमारीत शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुरज चव्हाण यांच्यासह महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांचे निवासस्थासह इतर काही आस्थापना आणि अन्य काही महत्त्वाच्या ठिकाणांवरून ईडीने छापे टाकले होते. गुरुवारी, भायखळ्यातील महापालिकेच्या खरेदी विक्री कार्यालयावर ईडीने छापा टाकला असून कोविड काळात झालेल्या खरेदी विक्रीचे अनेक धागेदोरे या कार्यालयात असल्याचा संशय ईडी अधिकाऱ्यांना आहे.

गुरुवारी ईडीने केलेल्या कारवाईत मुंबई महापालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी हरीश राठोड आणि तत्कालीन उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या घरावरील छापेमारीचा समावेश आहे. या दोघांचा कोविड काळात झालेल्या कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार प्रकरणात थेट समावेश असल्याची चर्चा असून त्या अनुषंगाने या दोघांवर आता ईडीने लक्ष केंद्रित केल्याचे बोलले जात आहे. ईडीने कारवाई केलेली सर्व मंडळी आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांपैकी असून जर या चौकशीत काही तथ्य आढळले तर हा गैरव्यवहार ठाकरेंना अंगलट येणार हे निश्चित आहे.