वारकऱ्यांसाठी पाच हजार बसेसचा ताफा सेवेत!

मुंबई : श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी पाच हजार बसेसचा ताफा सेवेत आला आहे. एसटी महामंडळातर्फे सुमारे पाच हजार विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. २५ जुन ते ०५ जुलै, २०२३ दरम्यान या विशेष बसेस धावणार आहेत. माऊलींच्या रिंगण सोहोळ्यासाठी २७ जुन रोजी २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर यात्रेच्या जादा वाहतूकीचा आढावा घेतला आहे. संभाजीनगर १२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १००० तर अमरावती येथून ७०० अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

पंढरपूर यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा विभागातून एसटी बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून पंढरपूर येथे जाणारे वारकरी तसेच भक्तांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे. लाखो भाविक प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटीचे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी तसेच अधिकारी वर्ग अहोरात्र कार्यरत राहणार आहेत.