मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणलेला विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तालुक्यातील तळोदा-भवर रस्त्यावरील तळोदा शिवारातील भवर फाट्याजवळ जप्त केला असत्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काचे दुय्यम निरीक्षक अ. शा. गायकवाड यांनी दिली.
राज्याचे राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, नाशिक विभागीय उपायुक्त उषा वर्मा, राज्य उत्पादन शुल्कचे नंदुरबार येथील अधीक्षक स्नेहा सराफ यांच्या मार्गदर्शनात पथकाने ही कारवाई केली. कारवाईत टोयाटो इनोव्हा कार (जीए ०५, सीजी ३२०६) जप्त करण्यात आली असून, वाहनातून सुमारे ७० बॉक्स म्हणजेच ६०४.८ लीटर विदेशी दारू जप्त करण्यात आली. कारवाईत मुद्देमालाची किंमत १४ लाख १९ हजार ६०० रुपये आहे.
याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक अ. शा. गायकवाड तपास करीत आहेत. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक व्ही. ए. चौरे, दुय्यम निरीक्षक अ. शा. गायकवाड, डी. बी. कोळपे, राजपूत, संदीप वाघ, सौरव चौधरी, अमित अहिरराव, कल्पेश वाणी यांनी केली.
अवैध मद्यनिर्मिती, विक्री, वाहतूक यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९९ किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ यावर संपर्क साधावा, असे आवाहन दुय्यम निरीक्षक गायकवाड यांनी केले आहे.