जळगाव । केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने जलसंधारण आणि पाणी संचय वाढवण्यासाठी वनराई बंधारा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. 20 सप्टेंबर 2024 रोजी केशवस्मृती प्रतिष्ठान, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि कृषी विभाग यांच्या सहकार्याने वनराई बंधारा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.
या कार्यक्रमात केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भरतदादा अमळकर यांनी वनराई बंधाऱ्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, वनराई बंधारा शेतकऱ्यांसाठी एक दीर्घकालीन पाणी संचय संरचना आहे, जे त्यांच्या पिकांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करेल. पिंपळकोठा (ता.एरंडोल) येथील गावकऱ्यांनी श्रमदानातून एक महत्त्वपूर्ण वनराई बंधारा बांधला आहे. खैऱ्या नाल्यावर लीलाधर बापूराव बडगुजर यांच्या शेतात हा बंधारा बांधला आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट पाणी संधारण आणि शेतकऱ्यांना पिकांच्या वाढीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देणे आहे.
‘समग्र कृषी ग्रामीण विकास प्रकल्प’ आणि एरंडोल तालुका कृषी विभाग यांच्या सहकार्याने वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. या बंधाऱ्याची उंची तीन मीटर आणि रुंदी 10 मीटर आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साठवले जाऊ शकते, जे शेतकऱ्यांच्या पिकांना लागणाऱ्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
या बंधाऱ्याच्या उद्घाटन समारंभप्रसंगी एरंडोल येथील कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यामध्ये तालुका कृषी अधिकारी डी.पी. गंभीरे, मंडळ कृषी अधिकारी आर. बी. पवार, कृषी पर्यवेक्षक किशोर साळुंके, कृषी सहाय्यक कुणाल पाटील, अशोक सोनवणे, धनंजय सावंत, सचिन पाटील, चंद्रकांत जगताप तसेच केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित ‘समग्र कृषी ग्रामीण विकास प्रकल्पा’चे प्रमुख तथा ‘आत्मा’चे माजी प्रकल्प संचालक अनिल भोकरे, प्रकल्प व्यवस्थापक आदित्य सावळे, प्रकल्प सहाय्यक राजन इंगळे आणि पिंपळकोठा गावातील शेतकरी लीलाधर बापूराव बडगुजर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
श्रमदानातून वनराई बंधारा
या वनराई बंधाऱ्याच्या निर्मितीमध्ये गावकऱ्यांनी आपला महत्वपूर्ण सहभाग नोंदविला आहे. श्रमदानातून हा प्रकल्प पूर्ण केला गेला असून, यामुळे जलसंधारणाचे महत्त्व लक्षात येते. पिंपळकोठा गाव आणि आसपासच्या शेतकऱ्यांना या बंधाऱ्यामुळे मोठा फायदा होईल, कारण ते पिकांसाठी पाणी साठवू शकतील.
पाणी साठवण्याची समस्या सुटणार
लीलाधर बडगुजर यांच्या शेतावर बांधलेल्या या बंधाऱ्यामुळे पाणी साठवण्याची समस्या सोडवली जाईल आणि त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. हा प्रकल्प भविष्यात ग्रामीण पाणी संधारण आणि कृषी सुधारणा यासाठी एक आदर्श ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
या प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभात मान्यवरांनी शेतकऱ्यांना पाणी साठवण्याचे महत्त्व सांगितले. समग्र कृषी ग्रामीण विकास प्रकल्पाचे प्रमुख अनिल भोकरे यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याचे कौतुक करत, यापुढेदेखील असे उपक्रम राबविण्याचा निर्धार केला.
वनराई बंधाऱ्यासाठी ग्रामस्थ तयार
वनराई बंधाऱ्याच्या उद्घाटनाच्या वेळी गावकऱ्यांनी या बंधाऱ्याचे निरीक्षण केले आणि त्यांनी दहापेक्षा अधिक वनराई बंधारे बांधण्यासाठी तयार असल्याचे जाहीर केले. त्यांचा उद्देश आहे की, हे वनराई बंधारे त्यांच्या गावातील सर्व शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरावे आणि पाणी साठवण्याच्या समस्येचे निराकरण होऊ शकेल.
वाढत्या पाणी संकटाच्या पार्श्वभूमीवर वनराई बंधाऱ्यांसारखे जलसंधारणाचे उपाय महत्वाचे ठरले आहेत. केशवस्मृती प्रतिष्ठान आणि कृषी विभागाच्या सहकार्याने हे वनराई बंधारे शेतकऱ्यांना एक नवीन आशा देत आहेत.