संपूर्ण राज्याला हादरवरून सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. जालींदर सुपेकर यांची एंट्री झाली असून या प्रकरणी त्यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या रूपाली ठोबरे यांनी गंभीर आरोप केले आहेत.
वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणामुळे सर्वांना धक्का बसला आहे. या प्रकरणी त्यांचे पती, सासू आणि नणंदला अटक करण्यात आली असून सासरा व दिराच्या अटकेसाठी पथके कसून तपास करत आहेत. आता या प्रकरणात आता नवीनच माहिती समोर आली आहे. ज्येष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. जालींदर सुपेकर यांचे नाव या प्रकरणात घेतले गेले आहे.
वैष्णवीच्या सासूचे बंधू अर्थात तिच्या पतीचे मामा असणाऱ्या सुपेकर यांच्या नावाचा त्या नेहमीच धाक दाखवत असल्याचा आरोप हगवणेंची दुसरी सून मयुरी देशमुख यांनी केल्याने खळबळ उडाली. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स या सोशल मंचावर पोस्ट करत गंभीर आरोप केले आहेत. डॉ. जालींदर सुपेकर हे सध्या कारागृहाचे विशेष पोलीस महानिरिक्षक आहेत.
याआधी ते जळगावात जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. येथे पोलीस निरिक्षक अशोक सादरे यांच्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. हगवणे कुटुंब हे विकृत बुध्दीचे असून ते सुपेकर यांचा धाक दाखवून आपली वरपर्यंत पोहच असल्याचे दाखवत असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. हगवणे प्रकरणात आयपीएस अधिकारी डॉ. जालींदर सुपेकर यांचे नाव आल्याने एकच खळबळ उडाली आहे.