जळगाव : भाजपमध्ये प्रवेश केला आहे मात्र तो पक्षाने जाहीर केला नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे मात्र तो अध्यक्ष शरद पवार यांनी स्वीकारलेला नाही. त्यामुळे अजून काही दिवस भाजपकडून वाट बघेल आणि मूळ राष्ट्रवादी पक्षात पुन्हा कामाला लागेल, भूमिका आ. एकनाथराव खडसे यांनी माध्यमांकडे मांडली होती. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी पालकमंत्री सतीश आण्णा पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार एकनाथराव खडसे यांच्या भूमिकेबाबत ते म्हणाले की, यायचं असेल तर ज्या माणसाशी आपण वेगळ्या विचाराने वागलो, त्याला पाडण्याचाच प्रयत्न केला. जे पवार साहेबांचे निष्ठावान म्हणून राहिले. लोकसभा लढले आणि अचानक परत कोणीतरी सांगत असेल की मी आज राष्ट्रवादीचाच आहे. मग ज्याने निवडणूक लढली त्याचं काय स्थान आहे ? त्याच्या मनात ज्या यातना झाल्या. त्याच्या विरोधात जे केलं गेलं. ते कसा तो विसरू शकेल ? म्हणून त्यांनी श्रीराम पाटलाची पण माफी मागावी. आमच्याही कार्यकर्त्याच्या अपेक्षा असतात की, जो येतो तो प्रामाणिकपणे आला पाहिजे. ‘मी आजही पक्षाचा क्रियाशील सभासद आहे. मी पक्षाचाच आमदार आहे. असे कोणी म्हणत असेल तर त्याचे उत्तर पवार साहेबांनी द्यायला पाहिजे किंवा आमचे प्रांत अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, त्यांची निष्ठा आज कुठे आहे हे त्यांनी सुद्धा सिद्ध केली पाहिजे. एकीकडे ते बोलतात की मी राष्ट्रवादीकडे आहेत, दुसरीकडे ते म्हणतात की मी चार दिवस पक्षात अजून वाट पाहतो. म्हणजे काय उद्या जर भाजपवाल्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही घेतल आहे. तुम्ही या. मग इकडचा प्रवेश बंद होईल का ? किती राजकारण करावं त्याला सुद्धा सीमा असतात. त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्ता इकडचा, तिकडचा उंबरठा बदलण्यासाठी दहा वेळा विचार करतो. पण काही लोक त्याला इतक्यांदा संधी मिळाली आहे याचा ते विचार करत नाही सहज बोलून जातात त्यामुळे जिल्ह्यामध्ये आणि प्रश्न निर्माण होतात, असं श्री. पाटील म्हणाले.
मी प्रामाणिकपणाच राजकारण गेल्या 35 वर्षे करतो आहे. आज कोणी माझ्यावर बोट दाखवेल असं कधी माझ्या निष्ठा मी विकलेला नाही, विकू देणार नाही. शब्द वापरला की उद्या पवार साहेबांनी वेगळा विचार केला तर मी घरी थांबायचं. मी कधी बेईमान होणार नाही. आपण पाहतोय की पवार साहेब ज्या जिल्ह्यात जात आहे तिथं अनेक पक्षांतील कार्यकर्त्यांचा त्यांना प्रतिसाद मिळत आहे. तसेच साहेबांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहेत. हे सर्वच लोक उमेदवारीसाठी किंवा तिकीटासाठी नाही तर पवार साहेबांचा उत्साह आणि त्यांची काम करण्याची पद्धत बघून प्रवेश करत आहेत, असेही ते म्हणाले.