काँग्रेस प्रवेशाच्या निर्णयामुळे माजी आमदार चौधरींची राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांकडून मनधरणी

भुसावळ: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने माजी आमदार संतोष चौधरी यांनी काँग्रेसची वाट धरली आहे. नुकतीच त्यांनी मुंबईत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी संतोष चौधरींची भुसावळात भेट घेऊन मनधरणी केली. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती सचिन चौधरी, रावेर लोकसभा क्षेत्राचे कार्याध्यक्ष राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.

उमेदवारी कापल्याचे शल्य रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे केंद्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारीचा शब्द देवूनही उमेदवारी दिली नाही. यामुळेचौधरी पक्षावर नाराज आहेत. याच नाराजीतून त्यांनी मुंबईत नाना पटोले यांची भेट घेतली.

लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याच धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी चौधरींची भेट घेऊन मनधरणी केली मात्र संतोष चौधरी यांनी आपण मविआच्या घटक पक्षातच प्रवेश घेत आहोत, यामुळे आपल्या सोबतच राहू, अशी भूमिका मांडली. जवळपास तासभर चर्चा झाली.

यावेळीदेखील चौधरींनी आपल्यावर गेल्या १५ वर्षात पक्षाने अन्याय केला आहे, लोकसभा निवडणुकीतही संधी दिली नाही, याबाबत खंत व्यक्त केली. जिल्हाध्यक्षांच्या भेटीनंतर संतोष चौधरी राष्ट्रवादीसोबतच राहतील काय? किंवा काँग्रेस प्रवेश करतील याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.