जळगाव : महापालिकेच्या गिरणा पंपिंग स्टेशनमधून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या पाणीपुरवठा योजनेचे पाइप चोरी प्रकरणी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी जळगाव न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर शनिवारी सुनावणी होऊन पोलिसांनी आपले म्हणणे सादर करण्यासाठी पुरेशी मुदत मिळण्याची मागणी केली असता, त्यावर न्यायालयाने चार दिवसांची मुदत दिली. त्यानुसार संशयित सुनील महाजन यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे.
गिरणा पंपिंग प्लांटवरून शहराला पाणीपुरवठा केला जात होता. त्यासाठी या प्लांटपासून गिरणा टाकीपर्यंत पाइपलाइन टाकण्यात आलेली आहे. मात्र, आता ही योजना बंद आहे. गिरणा पंपिंग रस्त्यावर जेसीबीद्वारे चारी खोदून बिडाचे पाइप काढण्यात येऊन महापालिकेच्या मालमत्तेची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला.
या पाइप चोरीप्रकरणी अभियंता योगेश बोरोले यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नरेंद्र पानगळे, रवण चव्हाण, अक्षय अग्रवाल, भावेश पाटील, अमिन राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील म हाजन यांचे नाव समोर येऊन ते या चोरीप्रकरणात मुख्यसूत्रधार असल्याचे समोर आले. त्यामुळे या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी सुनील सुपडू महाजन यांच्यावरही गुन्हे दाखल केले. त्या दिवसापासून सुनील महाजन फरार असून त्यांनी ४ डिसेंबर रोजी अटकपूर्व जामिनासाठी जळगाव न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायाधीश राजूरकर यांच्या न्यायालयात आज सुनावणी होणार होती. मात्र, कोर्ट रजेवर असल्याने ती न्यायाधीश एस. बी. वावरे यांच्या न्यायालयात झाली.
दरम्यान, पोलिसांनी आपले म्हणणे सादर करण्यासाठी न्यायालयास पुरेशी मुदत मिळावी, अशी मागणी केली. त्यावर न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर चार दिवसांची मुदत दिली. त्यावर ११ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सुनील महाजन यांच्यातर्फे अॅड. जैनोद्दीन शेख काम पाहत आहेत.