Indian Railway । प्रवाशांनो, लक्ष द्या ! पश्चिम मध्य रेल्वेवर चार दिवसांचा ‘ब्लॉक’; ‘या’ गाड्यांच्या मार्गात बदल

भुसावळ । तुमचा ट्रेनने प्रवास करण्याचा प्लॅन असेल किंवा तुम्ही कुठेतरी जाण्यासाठी आरक्षण केले असेल, तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेच्या ‘नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक’मुळे पश्चिम मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या काही रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.

पश्चिम मध्य रेल्वेच्या जबलपूर विभागात पायाभूत विकासाच्या कार्यांना गती देण्यासाठी कछपुरा स्थानकावर ‘नॉन इंटरलॉकिंग’चे काम करण्यात येत आहे. त्यामुळे गाडी क्र.19013 भुसावळ -कटनी एक्सप्रेस दि. 05 ते 08 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपल्या प्रारंभिक स्थानकावरून निघून, आपल्या नियोजित मार्गाऐवजी इटारसी-भोपाल-बीना-कटनी मुड़वारा या मार्गाने जाणार आहे.

तर गाडी क्र. 19014 कटनी-भुसावळ एक्सप्रेस दि. 05 आणि 08 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपल्या प्रारंभिक स्थानकावरून निघून, आपल्या नियोजित मार्गाऐवजी कटनी मुड़वारा-बीना-भोपाल-इटारसी या मार्गाने आपल्या गंतव्यस्थानी पोहचणार आहे.

प्रवाशांनी या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.