धुळे : धुळे गुन्हे शाखेने शहरातून बुलेट चोरी करणाऱ्या चौकडीला अटक करीत त्यांच्याकडून शहरातील विविध भागातून लांबवलेल्या चार बुलेट जप्त केल्या आहेत. आरोपींनी यू ट्यूबवरून बंद बुलेट सुरू करण्याची माहिती पाहता, त्या माध्यमातून चोया केल्या. आरोपींकडून नऊ लाख रुपये किमतीच्या चार बुलेट व गुन्ह्यात वापरलेली इलेक्ट्रिक दुचाकी जप्त करण्यात आली. रूपेश ज्ञानेश्वर बारहाते, विपुल राजेंद्र बच्छाव,, ऋतिक उर्फ निकी अमृतसिंग पंजाबी, संजय प्रताप गुजराथी अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
चार आरोपींना अटक
एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना बुलेट चोरी करणाऱ्या टोळीबाबत माहिती मिळाली होती. मंगळवार, ३० जुलै रोजी एक संशयित सूर्या जीम चाळीसगाव रोड भागात आल्यानंतर पथकाला कारवाईच्या सूचना करण्यात आल्या. अल्पवयीन संशयिताला पकडल्यानंतर त्याने युट्यूबवरून बंद बुलेट दुचाकी सुरू करण्याची माहिती दिली. तसेच एका अल्पवयीनाच्या मदतीने वाहने चोरी करून त्यांचे मित्र रूपेश ज्ञानेश्वर बारहाते (रा. मोहाडी उपनगर, धुळे), विपुल राजेंद्र बच्छाव (रा. सहजीवन नगर, धुळे), अमित ऊर्फ बंटी संजय गावडे (रा. सहजीवन नगर, धुळे) (पसार), ऋतिक उर्फ निकी अमृतसिंग पंजाबी (रा. गुरुद्वाराचे पाठीमागे, धुळे) यांच्या मदतीने संजय प्रताप गुजराथी (रा. मोहाडी उपनगर, धुळे) व बलजीतसिंग जलोरसिंग बराड (रा. हनुमान नगर, पाचोरा बसस्थानकाचे पाठीमागे, जि. जळगाव (पसार) यांना विक्री केल्याची कबुली दिली. चार आरोपींना अटक केली असून अन्य पसार आरोपींचा शोध सुरू आहे.
यांच्या पथकाने आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, एपीआय श्रीकृष्ण पारधी, अमरजित मोरे, मच्छिंद्र पाटील, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, योगेश साळवे, गुलाब पाटील, राजीव गिते, असई संजय पाटील, अमोल जाधव, सुनील पाटील यांच्या पथकाने केली.