Accident : कार अपघात चार जणांचा मृत्यू ; आठ महिन्यांची मुलगी बचावली

Accident :  कर्नाटकातून मोटारीने शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घालून चौघा जणांना हिरावून घेतले. तर सहा जण जखमी झाले. यात आठ महिन्यांची मुलगी आश्चर्यकारकरीत्या बचावली. सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यातील पांडे गावाजवळ पहाटेच्या सुमारास भाविकांची तवेरा गाडी आणि कंटेनरची धडक हा अपघात घडला.

श्रीशैल चांदेगा कुंभार (वय ५५), शशिकला श्रीशैल कुंभार (वय ५०), ज्योती दीपक हुनशामठ (३८ रा. कलबुर्गी) व शारदा हिरेमठ (वय ६७, रा. हुबळी) अशी मृतांची नावे आहेत. तर सौम्या श्रीधर कुंभार (वय २६), कावेरी विश्वनाथ कुंभार (वय २४), शशिकुमार त्रिशाला कुंभार (३६), श्रीदार श्रीशैल कुंभार (वय ३८), नक्षत्रा विश्वनाथ कुंभार (वय ८ महिने) आणि तवेरा चालक श्रीकांत रामकुमार चव्हाण (वय २६) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. अपघातानंतर तवेरा गाडी रस्त्याच्या खाली पालथी होऊन अक्षरशः चक्काचूर झाली. अपघातानंतर कंटेनर चालकाने पलायन केले.

कर्नाटकतील कलबुर्गी, हुबळी, बागलकोट भागातील एकमेकांचे नातेवाईक असलेले भाविक देवदर्शनासाठी तवेरा गाडीतून प्रवास करीत होते. तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर हे भाविक तुळजापुरात मुक्काम करून बार्शी-परांडा-करमाळामार्गे पुढे शिर्डीकडे जाण्यासाठी निघाले होते. करमाळा तालुक्यातील पांडे गावच्या हद्दीत तवेरा व कंटेनर यांची जोरात धडक झाली. अपघाताची माहिती समजताच करमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना करमाळ्यातील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.