तापमान वाढलं : जळगावचे चार तालुके डेंजर झोनमध्ये!

जळगाव : जिल्ह्यात उन्हाळ्यात पाण्याचा अतिरिक्त उपसा होत असल्याने वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागातर्फे जानेवारीपासून पाणीपातळीचे निरीक्षण केले जाते. यंदा जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील पाणीपातळीत एक मीटरपर्यंत घट झाल्याची माहिती भूजल विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागातर्फे मागील पाच वर्षांची पाणीपातळीची सरासरी लक्षात घेऊन जिल्ह्यातील १५ तालुक्यांची पाणीपातळी मोजली जाते.

मागील वर्षांत १३० टक्क्यांपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले असले, तरी यंदा जानेवारी महिन्यातच जिल्ह्यातील चार तालुक्यांच्या पाणीपातळीत घट झाल्याचे दिसून येत आहे. पाणीपातळीत घट झाल्यास अतिरिक्त पाणीउपसा करण्यावर निर्बंध लावले जातात. तसेच याबाबतचा अहवालही जिल्हा प्रशासनाकडे सादर केला जातो.

या तालुक्यांतील पाणीपातळीत घट
जिल्ह्यात भुसावळ, बोदवड, यावल आणि धरणगाव तालुक्यांत पाणीपातळीत ०.३६ ते ०.९७ अशी घट झाल्याचे दिसून येत आहे. इतर तालुक्यांमध्ये मात्र पाणीपातळी ही समाधानकारक असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तालुकानिहाय पाणीपातळीची स्थिती
मुक्ताईनगर- ०.००, रावेर- ०.०९, भुसावळ- ०.५६, बोदवड- ०.९७, यावल- ०.९१, जामनेर- ०.१६, जळगाव- ०.२७, धरणगाव- ०.३६, एरंडोल- ०.८४, चोपडा- ०.७२, अमळनेर- १.०४, पारोळा- ०.०१, पाचोरा- ०.०४, भडगाव- ०.२६, चाळीसगाव- ०.२६ अशी पाणीपातळीची स्थिती आहे.