तरुण भारत लाईव्ह I जळगाव : बँकेतून बोलत असून एफडी अपडेट करायचे कारण पुढे करीत एका भामट्याने महिलेची साडेसात लाखांची एफडी परस्पर वळवून घेतली. ही घटना २० मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता घडली. ढाके कॉलनीत राहणाऱ्या महिलेसोबत हा प्रकार घडला आहे.
त्यांना सोमवारी दुपारी अनोळखी माेबाइल क्रमांकावरुन फोन आला. ‘आपण बंधन बँकेतून बोलत असून आमच्या बँकेतील तुमची एफडी अपडेट करायची आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला एक मेसेज मला पाठवा’, असे त्या भामट्याने सांंगीतले. दरम्यान, त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन महिलेने आलेला मेसेज भामट्याला पाठवला. त्यानंतर काही मिनिटातच एफडी वळल्याचा एसएमएस महिलेस प्राप्त झाला.
दरम्यान, सायबर भामट्याने महिलेची साडेसात लाख रूपयांची एफडी तोडून ती परस्पर वळून घेतल्याचे काही वेळानंतर समोर आले. महिलेने लागलीच सायंकाळी सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार सायबर ठगाविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.