Amalner : नोकरीचे आमिष दाखवत तरुणांची तीन लाखात फसवणूक, चौघांविरोधात गुन्हा दाखल

#image_title

अमळनेर : तालुक्यातील तरुणांना चांगल्या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत सात ते आठ तरुणांची तीन लाखरुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकातील चौघांविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी कि, अमळनेर तालुक्यातील काही तरुणांना प्रादेशिक सेनेमध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून नाशिक येथील चौघांनी तरुणांची तीन लाखात फसवणूक केल्याची घटना घडली. जानेवारी २०२२ मध्ये एका करियर मार्गदर्शन आयोजित कार्यक्रमात समाधान सुखदेव पाटील हा तरुण सहभागी झाला होता. त्यावेळेस विलास धर्माजी पांडव, सुलोचना विलास पांडव, दीपक विलास पांडव व सचिन मधुकर केदारे सर्व राहणार नाशिक यांच्याशी त्याची भेट झाली.

विलास पांडव यांनी त्याला प्रादेशिक सेनेमध्ये भरती होण्याचा सल्ला दिला. त्यासाठी नाशिक येथे सहा महिन्यांचा निवासी प्रशिक्षण व मार्गदर्शन कोर्स करावा लागतो. खाण्यापिण्यासह सर्व खर्च तीन-चार रुपये आहे. मात्र आम्ही तुम्हाला ५० हजाराची सूट देऊ असा विश्वास दिला. समाधान याने घरी विचारणा करून विलास पांडव याला होकार दिला .

यानंतर समाधान याने त्याचे मित्र प्रवीण सुरेश पाटील, उमेश मुरलीधर चव्हाण, मनोज सुरेश पाटील, ज्ञानेश्वर सुखदेव माळी, मंगेश संतोष पाटील, निखिल रवींद्र पाटील, जयेश ज्ञानेश्वर जाधव, दीपक ज्ञानेश्वर पाटील, याना सांगितले व त्यांनीही त्यांच्या परिस्थितीनुसार पैसे दिले. विलास पांडव याने तरुणांना खात्री पटावी म्हणून सागर मध्यप्रदेश येथे बोलावून घेतले. तेथील मार्गदर्शन केलेल्या उमेदवारांना वेगवेगळ्या पदावर नोकरी मिळाली म्हणून भासवले.

यानंतर विलास व त्याचा साथीदार सचिन केदारे यांच्या खात्यावर तरुणांकडून साडे तीन लाख रुपयेन मागवून मात्र अनेक महिने उलटून गेल्यावरही आम्हाला प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले नाही. लवकरच प्रशिक्षण सुरू होईल असे प्रत्येकवेळी सांगितले गेले. अखेरीस समाधान व त्याचा मित्र नाशिक येथे त्यांच्या घरी गेले असता, विलास याने त्यांच्याशी वाद घालत जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेबाबत समाधान याने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करीत आहेत.