मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर होताच सर्वच राजकीय पक्ष्यांची जोरदार कंबर कसली आहे. विविध पक्षांनी आपल्या तयारीला वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर महायुती सरकारने पत्रकार परिषद घेत आपले रिपोर्ट कार्ड २ ० २ २ सादर केले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अजित पवार उपस्थित होते. ‘महायुती- काम हिच ओळख’ असे टायटल असणारे रिपोर्ट कार्ड यावेळी सादर करण्यात आले. याचसोबत शेतकऱ्यांना 365 दिवस मोफत वीज महायुती सरकार कशी देणार याबात भाष्य केलं आहे.
महायुती सरकारचा रिपोर्ट कार्ड सादर करताना उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, “निवडणुकीचा शंखनाद झाला. या निमित्ताने महायुती सरकारने दोन वर्षात जे कार्य केलं त्याचं रिपोर्ट कार्ड ठेवत आहोत. अर्थात हे संक्षिप्त आहे. सविस्तर त्यातील प्रत्येक मुद्दा त्या त्या घटकांसाठी केलेली कामे याची पुस्तिका आहे. ती तुमच्यापर्यंत पोहोचवू” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्याने शेती वीजेसाठी स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन केली. 14 हजार मेगावॅट वीज निर्मितीचं काम सुरू केलं. येत्या 15 ते 18 महिन्यात पूर्ण काम होईल. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना 365 दिवस वीज देऊ. ही घोषणा नाही. प्रत्यक्ष काम सुरू केलं आहे. आता साडे आठ रुपयाची वीज 3 रुपयाला पडणार आहे. 10 हजार कोटी बजेट आणि पाच हजार कोटी क्रॉस सबसिडीचे आम्ही वाचवणार आहोत. त्याआधारे शेतकऱ्यांना मोफत वीजेची योजना आहे. प्रिंटिंग मिस्टेक घोषणा नाही. हा वेल थॉट म्हणजे विचारपूर्वक निर्णय घेतलाय. अनेक वर्ष तो चालणार आहे. विजेच्या बाबतीत शेतकऱ्यांना चिंता मुक्त करण्याचं काम आपण केलंय.”
“सिंचनाच्या क्षेत्रातही या सरकारने अभूतपूर्व काम केलं. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकाही प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली नाही. 145 प्रकल्पांना ही मान्यता दिली आहे. दुष्काळी भागात ही प्रकल्प मान्य केले आहेत. अनेक दुष्काळी भागातील कामे सुरूवात झाली आहे. सर्वात महत्त्वाचं नदी जोड प्रकल्प 90 हजार कोटीचा नारपार प्रकल्प केला. पश्चिमी वाहिन्यातून वाहून जाणारे 55 टीएमसी पाणी वाचवलं. मराठवाड्याला कायमचं दुष्काळ मुक्त करण्यासाठी कार्यवाही केली आहे. कोणतीही योजना कागदावर नाही. सर्व गोष्टींचं टेंडर निघालं. अनुसंधान सुरू आहे. सिंचन क्षेत्रात मोठं काम सुरू आहे” असही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.