मुंबई : फ्री रिचार्ज ऑफरच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळण्यासाठी TRAI देशातील करोडो मोबाईल यूझर्सना इशारा दिला आहे. देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांना लक्ष्य करणाऱ्या या घोटाळ्यांविषयी TRAI ने नुकतीच चेतावणी जारी केली आहे.
TRAI अशा कोणत्याही मेसेजपासून सावध राहण्यास सांगितले आहे. याशिवाय ट्रायने अशी कोणतीही ऑफर जारी केली नसल्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. फक्त टेलिकॉम कंपन्याच त्यांच्या यूझर्ससाठी मोबाइल रिचार्जशी संबंधित ऑफर आणतात. यासाठी यूझर्सना टेलिकॉम ऑपरेटरच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी किंवा कस्टमर केअरशी संपर्क साधावा.
ट्रायने बनावट मोबाइल रिचार्ज प्लॅनच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबाबत आपल्या व्हॉट्सॲप कम्युनिटी पोस्टद्वारे हा इशारा दिला आहे. ट्रायने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, स्कॅमर यूझर्सच्या डिव्हाइसवर प्रवेश मिळवण्यासाठी असे बनावट मेसेज पाठवतात जेणेकरून त्यांच्या फोनमधून बँकिंगसह पर्सनल माहिती चोरली जाऊ शकते.
मोबाईल वापरकर्त्यांनी सावधगिरी बाळगावी आणि रिचार्ज ऑफर्ससंदर्भात अधिकृत स्त्रोतांवरूनच माहिती मिळवावी. अशा प्रकारचे फसवे संदेश तुमच्या डिव्हाइसची सुरक्षा आणि वैयक्तिक माहिती धोक्यात आणू शकतात.
असे मेसेज आल्यावर काय करावे?
ट्रायने यूझर्सना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ट्रायने यूझर्सना सायबर क्राइम वेबसाइट https://Cybercrime.gov.in आणि संचार साठी पोर्टल https://sancharsaathi.gov.in वर तक्रार करण्यास सांगितले आहे.